विरोधकांनी ED ला धन्यवाद द्यावेत...; भर लोकसभेत PM मोदींनी दुखत्या नसीवर बोट ठेवले
By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2023 05:10 PM2023-02-08T17:10:52+5:302023-02-08T17:11:18+5:30
'काँग्रसने आरोपांशिवाय दुसरे काहीच केले नाही, 9 वर्षे यांनी वाया घालवली.'
नवी दिल्ली: राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलताना काँग्रेसने मोदी सरकारवर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर आता आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसच्या आरोपांवर उत्तर देताना सडकून टीका केली. यावेळी मोदींनी काँग्रेसच्या काळात झालेल्या आरोपांचा पाढाच वाचला. तसेच, काँग्रेसने मोठी संधी असतानाही देशाला मागे आणले, असा आरोपही केला.
यावेळी मोदी म्हणाले, 'प्रत्येक भारतीयाला माहितीये, 2014 पूर्वीचे दशक लॉस्ट डेकेट नावाने ओळखले जाते, पण 2030 इंडियाच डेकेट नावाने ओळखले जाणार. लोकशाहीत टीकेला खूप महत्व आहे. भारतात लोकशाहीला फार महत्व आहे आणि लोकशाहीत टीका झालीच पाहिजे. लोकशाहीला मजबूत करण्यासाठी टीका शुद्धीयज्ञाचे काम करते. पण, विरोधकांनी या काळात काहीच मेहनत घेतली नाही. नऊ वर्षे यांनी फक्त आरोपांमध्ये वाया घातले. आरोपांशिवाय यांनी काहीच केले नाही.'
मोदी पुढे म्हणाले, 'निवडणुकीत पराभव झाला की ईव्हीएमवर आणि निवडणूक आयोगावर आरोप करायचा. कोर्टाने विरोधात निकाल दिला की, कोर्टावर आरोप करायचा. भ्रष्टाचाराचा तपास होत असेल तर तपास संस्थांवर आरोप करायचा. सैन्याने आपले शौर्य दाखवले तर सैन्यावर आरोप करायचा. कधी देशाच्या विकासाच्या बातम्या आल्या, जगातील मोठ्या संस्था देशाचे नाव घेत असेल तर आरबीआय आणि आर्थिक संस्थांना शिव्या द्यायच्या आणि आरोप करायचे. निवडणुकीत यांचा पराभव झाला, पण हे सगळे कधीच ऐकत्र आले नाही. पण, ईडीमुळे हे सगळे एकत्र आले. यांनी ईडीला धन्यवाद दिला पाहिजे,' असा टोलाही मोदींनी लगावला.