PM Narendra Modi Parliament Session 2024 :संसदेच्या विशेष अधिवेशनात पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आज राज्यसभेतून राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावरील चर्चेला उत्तर दिले. यावेळी त्यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. "पेपर फुटीसारख्या संवेदनशील मुद्द्यावर राजकारण होऊ नये, अशी आमची इच्छा होती, पण विरोधकांना त्याची सवय झाली आहे. तरुणांच्या भवितव्याशी खेळणाऱ्यांना कठोर शिक्षा व्हावी, यासाठी कारवाई करण्यात येत असल्याची ग्वाही मी भारतातील तरुणांना देतो," असे पीएम मोदी म्हणाले.
पुन्हा आणीबाणीचा मुद्दा...आम्ही आणीबाणीच्या मुद्द्यावर काही बोलल्यावर म्हणतात, ती जुनी गोष्ट आहे. तुमची पापे जुनी होतात का? त्यावेळी जयप्रकाश नारायण यांची तब्येत इतकी बिघडली की, ते पुन्हा उठू शकले नाहीत. त्यांच्यासोबत(काँग्रेस) बसलेल्या अनेक पक्षांची काही मजबुरी असेल. त्यांच्यासोबत बसलेले अनेक पक्ष अल्पसंख्याकांसोबत असल्याचा दावा करतात. आणीबाणीच्या काळात तुर्कमान गेट आणि मुझफ्फरनगर येथे जे घडले, त्याबद्दल बोलण्याचे धाडस ते करू शकतात का? आता हेच लोक काँग्रेसला क्लीन चिट देत आहेत. ही काँग्रेस परजीवी आहे, देशातील जनतेने आजही त्यांना स्वीकारलेले नाही. त्यांना खोट्या गोष्टी आणि बनावट व्हिडिओद्वारे देशाची दिशाभूल करण्याची सवय आहे," अशी टीका मोदींनी यावेळी केली.
'आप'ने घोटाळा करावा, काँग्रेसने तक्रार करावी अन् शिव्या मोदीला...'ते पुढे म्हणता, "काँग्रेसवाल्यांनी निर्लज्जपणे भ्रष्टाचारी बचाव आंदोलन सुरू केले. आम्ही कारवाई का करत नाही, अशी विचारणा आम्हाला करायचे. आता भ्रष्टाचारी तुरुंगात जात आहेत, तर हेच लोक तपास यंत्रणांवरच प्रश्न उपस्थित करत आहेत. 'आप'ने घोटाळा केला तर काँग्रेसवाले तक्रार करतात अन् सरकारने कारवाई केली तर मोदीला शिव्या देतात. पत्रकार परिषदेत दिलेले पुरावे खोटे होते का, हे काँग्रेसने सांगावे. हे दुटप्पी लोक आहेत, सगळा ढोंगीपणा सुरू आहे. हे लोक दिल्लीत एका मंचावर बसून भ्रष्टाचाऱ्यांना वाचवण्यासाठी रॅली काढतात. त्यांचेच राजपुत्र त्यांच्या एका सहकारी मुख्यमंत्र्यांना केरळमध्ये तुरुंगात पाठवण्याची भाषा वापरतात," अशी टीका पीएम मोदींनी यावेळी केली.
एकाही भ्रष्टाचाऱ्याला सोडणार नाही, ही मोदींची गॅरंटीएजन्सींच्या गैरवापराच्या आरोपाला उत्तर देताना पीएम मोदी म्हणाले की, "भ्रष्टाचाराविरोधात कारवाई, हे आमचे ध्येय आहे. हा आमच्यासाठी निवडणुकीतील मुद्दा नाही. 2014 मध्ये आम्ही सरकार स्थापन केले, तेव्हा म्हटले होते की आमचे सरकार गरिबांच्या कल्याणासाठी काम करेल. आमचे सरकार भ्रष्टाचार आणि काळ्या पैशावर हल्ला करेल. आम्ही गरीब कल्याण योजना राबवत आहोत. काळ्या पैशाविरोधात आम्ही कायदा केला. आम्ही डीबीटी सुरू केला, डिजिटल तंत्रज्ञान वापरले. जेव्हा योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचतात, तेव्हा त्यांचा लोकशाहीवरील विश्वास वाढतो आणि त्याचाच परिणाम म्हणजे, मी तिसऱ्यांदा इथे बसलो आहे. मी स्पष्टपणे सांगतो की, आम्ही एजन्सींना भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचाऱ्यांवर कारवाई करण्यास मोकळीक दिली आहे. एकही भ्रष्टाचारी वाचणार नाही, ही मोदीची गॅरंटी आहे," असेही पंतप्रधान मोदींनी म्हटले.