PM Narendra Modi News: लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात मतदान कमी झाल्यामुळे आता दुसऱ्या टप्प्यात नेमके काय होते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. अगदी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून बहुतांश पक्षाच्या नेत्यांनी मोठ्या प्रमाणात मतदान करण्याचे आवाहन केले होते. दुसऱ्या टप्प्यातील मतदानाची वेळ संपल्यानंतर किती मतदान झाले, याची काही आकडेवारी समोर आली आहे. यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्सवर एक खास पोस्ट करत मतदारांचे आभार मानले. तसेच विरोधकांना खोचक टोला लगावला.
लोकसभा निवडणुकीचे टप्पे जसजसे पुढे सरकत आहेत, तसा प्रचाराला वेग आलेला पाहायला मिळत आहे. देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून सर्व पक्षीय नेते अगदी पूर्ण ताकद लावून प्रचार करताना दिसत आहेत. ठिकठिकाणी प्रचारसभा, बैठका, मेळावे घेतले जात आहेत. यातच दुसऱ्या टप्प्यातील मतदारानावर पंतप्रधान मोदी यांनी समाधान व्यक्त केले आहे.
एनडीएला मिळणारा पाठिंबा विरोधकांची निराशा वाढवणारा
दुसऱ्या टप्प्यातील मतदान चांगले झाले. दुसऱ्या टप्प्यात मतदान करणाऱ्या संपूर्ण देशभरातील लोकांचे आभार. एनडीएला मिळत असलेला अतुलनीय पाठिंबा विरोधकांची निराशा आणखी वाढवणारा आहे. मतदारांना एनडीएचे सुशासन हवे आहे. युवा आणि महिला मतदार एनडीएच्या भक्कम पाठिंब्याला ताकद देत आहेत, अशी पोस्ट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्सवर केली आहे.
दरम्यान, सायंकाळी पाच वाजता देशभरात झालेल्या मतदानाच्या आकडेवारीनुसार, आसाममध्ये ७०.६६ टक्के, बिहारमध्ये ५३.०३ टक्के, छत्तीसगडमध्ये ७२.१३ टक्के, जम्मू-काश्मीरमध्ये ६७.२२ टक्के, कर्नाटकात ६३.९० टक्के, केरळमध्ये ६३.९७ टक्के, मध्य प्रदेशात ५४.८३ टक्के, महाराष्ट्रात ५३.५१ टक्के, मणिपूरमध्ये ७६.०६ टक्के, राजस्थानमध्ये ५९.१९ टक्के, त्रिपुरात ७७.५३ टक्के, उत्तर प्रदेशमध्ये ५२.७४ टक्के आणि पश्चिम बंगालमध्ये ७१.८४ टक्के मतदार झाल्याची माहिती देण्यात आली आहे.