नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांच्या स्मृतीदिनानिमित्त त्यांना आदरांजली वाहिली. 'स्मृतिदिनानिमित्त पंडित जवाहरलाल नेहरुजींना अभिवादन. त्यांनी देशासाठी दिलेलं योगदान आमच्या स्मरणात राहील,' अशा शब्दांमध्ये मोदींनी ट्विटरवरुन त्यांच्या भावना व्यक्त केल्या. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी मोदींनी नेहरु आणि गांधी घराण्यावर वारंवार टीका केली होती. त्याआधी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी आणि यूपीएच्या चेअरमन सोनिया गांधींन नेहरुंच्या 55 व्या पुण्यतिथीनिमित्त नवी दिल्लीतील शांतीवन येथे आदरांजली वाहिली. 'नेहरुंनी उभारलेल्या स्वतंत्र, कार्यक्षम संस्थांमुळे 70 वर्षांनंतरही देशात लोकशाही टिकून आहे,' अशा शब्दांमध्ये राहुल यांनी नेहरुंचं स्मरण केलं. 'भारतासोबत स्वतंत्र झालेल्या अनेक देशांमधील लोकशाही जाऊन तिथे हुकूमशाही आली. मात्र नेहरुंमुळे देशातील लोकशाही अद्याप तग धरून आहे,' असं राहुल यांनी ट्विटमध्ये म्हटलं. 'नेहरुंच्या पुण्यतिथीनिमित्त सशक्त, स्वायत्त संस्था उभारणाऱ्या या नेत्याच्या कार्याचं स्मरण करू. त्यांनी उभारलेल्या मजबूत संस्थांमुळे 70 वर्षांनंतरही देशातील लोकशाही अस्तित्वात आहे,' अशा शब्दांमध्ये राहुल यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी शांतीवनला भेट देऊन आदरांजली वाहिली.