नवी दिल्ली : कोरोना लसीकरण सर्टिफिकेटवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो हटवण्यात आला आहे. कोरोना महामारीच्या काळात लसीकरण झाल्यानंतर केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून सर्टिफिकेट जारी करण्यात आले होते, ज्यावर तळाशी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो होता. या फोटोवर 'Together, India will defeat COVID-19'अशी कॅप्शन देण्यात आली होती. मात्र, आता या सर्टिफिकेवर कॅप्शनमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो दिसत नाही.
दरम्यान, संदीप मनुधाने नावाच्या एका एक्सवरील युजरने त्याच्या कोरोना लस सर्टिफिकेटचा फोटो शेअर केला आहे. यामध्ये म्हटले आहे की, सर्टिफिकेटवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो काढून टाकण्यात आला आहे. "कोविड लस सर्टिफिकेटवर मोदीजी आता दिसत नाहीत. ते तपासण्यासाठी फक्त लसीचे सर्टिफिकेट डाउनलोड केले, त्यातून त्यांचा फोटो गायब झाला आहे", असे युजरने म्हटले आहे. अशा परिस्थितीत कोरोना सर्टिफिकेटवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो का काढला गेला? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
द प्रिंटच्या वृत्तानुसार, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, लोकसभा निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता लागू असल्यामुळे लसीकरण सर्टिफिकेटमधून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो काढून टाकण्यात आला आहे. तसेच, संदीप मनुधाने यांनीही आपल्या ट्विटमध्ये असेच म्हटले आहे. दरम्यान, लोकसभा निवडणुकीसाठी दोन टप्प्यात मतदान झाले आहे. सध्या आदर्श आचारसंहिता लागू आहे. पुढील टप्प्यातील निवडणूक संपल्यानंतरच आचारसंहिता संपेल.
दोन दिवसांपूर्वी ऑक्सफर्ड-एस्ट्राजेनेका या कोरोना लसीबाबत एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ही लस तयार करणाऱ्या एस्ट्राजेनेका कंपनीने युनायटेड किंग्डमच्या उच्च न्याालयामध्ये काही कागदपत्रं दिली असून, त्यामधून या कंपनीने त्यांच्या कोविड-१९ लसीमधून टीटीएससारखा दुर्मीळ आजार होऊ शकतो, असा दावा केला आहे. एस्ट्राजेनेका लसीची अनेक देशांमध्ये कोविशिल्ड आणि वॅक्सजेवरिया या नावांनी विक्री करण्यात आली होती. भारतातील नागरिकांना सुद्धा कोविशिल्ड लस देण्यात आली आहे. त्यामुळे भारतातकोरोना लसीकरणावरून राजकीय वातावरण तापले आहे.