नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पंजाब दौऱ्यावर असताना सुरक्षा त्रुटींचा सामना करावा लागला. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या प्रकरणाने चांगलाच जोर धरला आहे. या मुद्द्यावरून भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस आमनेसामने आले आहेत. प्रियांका गांधी वाड्रा यांना पंतप्रधानांच्या सुरक्षेतील त्रुटींबद्दल माहिती दिल्याने मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांना सर्व बाजूंनी टीकेचा सामना करावा लागत आहे. पण आता प्रियंका गांधी यांनी त्यावर आपले स्पष्टीकरण दिले आहे.
'मला पंतप्रधानांची काळजी'पंतप्रधानांसोबत झालेल्या घटनेची माहिती प्रियंका गांधींना दिल्यामुळे सीएम चन्नी यांच्यावर भाजपने जोरदार टीका केली होती. 'कोण आहेत प्रियांका गांधी, त्यांना मुख्यमंत्र्यांनी का माहिती दिली?' असा सवाल भाजपने उपस्थित केला होता. त्यानंतर आता काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी स्पष्टीकरण दिले आहे. त्या म्हणाल्या, 'पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारताचे पंतप्रधान आहेत. संपूर्ण देशातील जनतेला त्यांची काळजी आहे. मलाही त्यांची काळजी वाटते. त्यामुळेच मी सीएम चरणजीत सिंग चन्नींना फोन करुन या संदर्भात माहिती घेतली.
सीएम चन्नी विरोधकांच्या निशाण्यावर
भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा म्हणाले, 'प्रियांका यांच्याकडे कोणते घटनात्मक पद आहे? पंतप्रधानांच्या सुरक्षेबाबत त्यांना का माहिती दिली? यावर गांधी घराण्याने स्पष्टीकरण दिले पाहिजे, असे आमचे ठाम मत आहे. पंजाबमध्ये पंतप्रधानांच्या सुरक्षेत त्रुटी असल्याच्या प्रकरणावरुन राजकीय पक्षांच्या निशाण्यावर आलेले सीएम चन्नी यांनी अलीकडेच पीएम मोदींच्या सुरक्षेत कोणतीही त्रुटी नसल्याचे म्हटले आहे.
'भाजप अफवा पसरवत आहे, जीवाला धोका नाही'
चन्नी म्हणाले, भाजप सरकार याप्रकरणी अफवा पसरवत आहे. पंजाबमध्ये पंतप्रधानांच्या जीवाला कोणताही धोका नाही. मी त्यांना दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा देतो. यात पंजाब पोलिसांचा कोणताही दोष नव्हता. भाजपचे मंत्री आणि केंद्र सरकार यावर गदारोळ घालण्याचा प्रयत्न करत आहेत, अस चन्नी म्हणाले होते.