जामनगर : जागतिक वन्यजीव दिनाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातच्या जामनगरमध्ये उभारलेल्या वन्यजीव संरक्षण केंद्र ‘वनतारा’चे उद्घाटन केले. वन्यजीव संरक्षण व संवर्धनासाठी समर्पित असलेल्या या केंद्रात त्यांनी बराच वेळ घालवला आणि प्राण्यांसाठी निर्माण करण्यात आलेल्या जागतिक दर्जाच्या सुविधांची पाहणी केली. वनतारा प्रकल्प उद्योगपती मुकेश अंबानी यांचे पुत्र अनंत अंबानी यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आला आहे.
पंतप्रधानांनी आशियाई सिंहाचा बछडा, पांढऱ्या सिंहाचा बछडा आणि अत्यंत दुर्मिळ क्लाऊडेड बिबट्याच्या पिल्लांना यावेळी दूध पाजले. पंतप्रधानांनी प्राण्यांसाठी खास तयार करण्यात आलेल्या मल्टी-स्पेशालिटी हॉस्पिटलची पाहणी केली. वनतारामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मेहनतीची त्यांनी विशेष प्रशंसा केली. वनतारामध्ये जगातील सर्वात मोठे हत्ती रुग्णालय असून, ते सर्व सुविधांनी सज्ज आहे.
३,००० एकरमध्ये पसरलेला अनंत अंबानींचा हा ड्रीम प्रोजेक्ट असून हे २,००० हून अधिक प्रजातींचे घर आहे. १.५ लाखांहून अधिक संकटात सापडलेल्या प्राण्यांची सुटका ‘वनतारा’ने केली आहे.
या उत्तम प्रयत्नासाठी मी अनंत अंबानी आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे कौतुक करतो. वनताराचे प्रयत्न खरोखरच प्रशंसनीय आहे, या पृथ्वीतलावर आपल्यासोबत राहणाऱ्या प्राण्यांचेही आपण रक्षण करतो हे आपल्या युगानुयुगे आदर्शाचे जिवंत उदाहरण आहे. - नरेंद्र मोदी, पंतप्रधान