नवी दिल्ली - भाजपच्या संसदीय पक्षाच्या बैठकीत आज बुधवारी गुजरात विधानसभा निवडणुकीतील विजयानिमित्त जल्लोष साजरा करण्यात आला. या बैठकीत भाजपच्या सर्व खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे एका आवाजात अभिनंदन करत त्यांना गुजरात विजयाचे श्रेय दिले. मात्र, यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, या विजयाचे श्रेय मला देऊ नका. कारण या विजयाचे खरे श्रेय सी.आर.पाटील यांना जाते. या निवडणुकीसाठी त्यांनी प्रचंड मेहनत केली. त्यांच्या या मेहनतीमुळेच पक्षाला विधानसभा निवडणुकीत विक्रमी जागा जिंकता आल्या.
सीआर पाटील यांचे कौतुक करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, ते कधीच व्यासपीठावर फोटो काढत नाहीत. ते संघटनेसाठी काम करत असतात. महत्वाचे म्हणजे, सीआर पाटील हे गुजरात भाजपचे अध्यक्ष आहेत. गुजरातमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला 156 जागा मिळाल्या, हा आतापर्यंतचा विक्रमी आकडा आहे. गुजरातच्या स्थापनेनंतर एवढ्या मोठ्या प्रमाणावर जागा जिंकणारा भाजप हा पहिला पक्ष ठरला आहे.
या शिवाय, संसदीय पक्षाच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी G-20 च्या तयारीसाठी सर्वच खासदारांना एकत्र येण्याचे आणि आपला सहभाग निश्चित करण्यासंदर्भा आवाहन ही केले.
अर्थव्यवस्थेवर प्रझेंटेशन -केंद्रीय मंत्री अश्वनी वैष्णव यांनी भाजप संसदीय पक्षाच्या बैठकीत अर्थव्यवस्थेवर प्रेझेंटेशन केले. यावेळी त्यांनी देशातील महागाईवर भाष्य केले. जगाचा विचार करता, भारतातील परिस्थिती अधिक चांगली आहे. भारतात महागाईचा दर फार कमी आहे. तसेच, देशाची अर्थव्यवस्था ही जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे, असेही वैष्णव यांनी म्हटले आहे.