नवी दिल्ली - 17 व्या लोकसभेच्या अध्यक्षपदी कोटा येथील भाजपाचे खासदार ओम बिर्ला यांची निवड करण्यात आली आहे. ओम बिर्ला यांची निवड झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या अभिनंदन प्रस्तावावर बोलताना बिर्ला यांचा स्वभाव सौम्य आणि विनम्र असल्याने आपल्याला भीती वाटते असं सांगितले. बिर्ला यांच्यासोबत काम करताना खूप काही शिकायला मिळालं. ओम बिर्ला लोकसभेची प्रतिष्ठा उंचाविण्यासाठी सक्षम आहेत असं कौतुक मोदींनी केलं.
यावेळी बोलताना नरेंद्र मोदी म्हणाले की, कोटामधून निवडून आलेले खासदार ओम बिर्ला हे नेहमी समाजकारणात सक्रीय असणारी व्यक्ती आहे. बिर्ला यांच्यासारख्या व्यक्तिमत्वाची निवड लोकसभा अध्यक्षपदासाठी करताना आम्हाला गर्व होतो. विद्यार्थी जीवनापासून ओम बिर्ला राजकीय जीवनात कार्यरत आहेत. समाजाप्रती त्यांची भावना वाखणण्याजोगी आहे. कोटामध्ये बदल घडविण्यासाठी नेहमीच त्यांनी योगदान दिलं आहे.
तसेच ओम बिर्ला यांचा स्वभाव विनम्र आणि संवेदनशील आहे. त्यांच्यासारख्या व्यक्तीला लोकसभा अध्यक्षपद मिळणं हे भाग्य आहे. सभागृह सुरळीतपणे चालविण्यासाठी ते नक्कीच योग्य दिशा देतील असा विश्वास आम्हाला वाटतो. त्यांचे स्मित हास्य पाहिलं तर कधी कधी भीती वाटते की त्यांच्या विनम्र आणि विवेकबुद्धीचा कोणी दुरुपयोग करु नये. आधीच लोकसभा अध्यक्षांना कठीण प्रसंगांना तोंड द्यावं लागतं मात्र आता उलटं झालं आहे. राज्यसभा सभापतींना त्यांच्यापेक्षा अधिक कठीण पेचाला सामोरं जावं लागतं.
ओम बिर्लांच्या सामाजिक कार्याचं कौतुक राजकीय जीवनात नेत्याची प्रतिमा अशी असते जो 24 तास राजकारण करतो. मात्र सध्याच्या वर्तमानकाळात नेत्याच्या राजकीय जीवनात जास्त प्रमाणात सामाजिक सेवा असते. ओम बिर्ला यांची कार्यशैली समाजकारणाशी जोडलेली आहे. कच्छमध्ये भूकंप झाला होता तेव्हा ओम बिर्ला यांनी दिर्घकाळ समाजातील घटकांची मदत केली. कोटात कोणी भुकेने व्याकूळ होताना दिसत असेल त्याला अन्नदान करण्याचं काम ओम बिर्ला करतात. केदारनाथ या तीर्थक्षेत्रास्थळीही ओम बिर्ला यांचे समाजकार्य सुरु असते.