लोकसभा निवडणुकीसंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठी भविष्यवाणी केले आहे. "यावेळी पश्चिम बंगालमध्ये भाजपला सर्वाधिक यश मिळणार आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजपची कामगिरी सर्वोत्तम ठरणार आहे. पश्चिम बंगालच्या निवडणुका एकतर्फी आहेत. त्यांचे नेतृत्व जनता जनार्दन करत आहे. यामुळे सरकारमध्ये बसलेले टीएमसीचे लोक गडबडले आहेत," असे पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी म्हटले आहे. ते एएनआयला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.
मोदी म्हणाले, "पश्चिम बंगालमध्ये सातत्याने हत्या होत आहेत. हल्ले होत आहेत. मतदानापूर्वीच भाजप कार्यकर्त्यांना तुरुंगात टाकले जात आहे. एवढे अत्याचार होऊनही लोक अधिकाधिक मतदान करत आहेत. टीएमसी बंगालच्या निवडणुकीत अस्तित्वाची लढाई लढत आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत आमचे तीन लोक होते आणि बंगालच्या लोकांनी आम्हाला 80 वर नेले. गेल्या वेळीही लोकसभा निवडणुकीत आपल्याला प्रचंड बहुमत मिळाले होते. यावेळी पश्चिम बंगालमध्ये भाजपला सर्वाधिक यश मिळेल."
पश्चिम बंगालमध्ये लोकसभेच्या एकूण 42 जागा आहेत. गेल्या निवडणुकीत येथे भाजपला 18 जागा मिळाल्या होत्या. तर टीएमसीला 22 आणि काँग्रेसला केवळ दोन जागा मिळाल्या होत्या. महत्वाचे म्हणजे, त्यावेळी डाव्यांचा पार सुपडा-साफ झाला होता. गेल्या निवडणुकीतील सर्वोत्तम कामगिरीसंदर्भात बोलायचे झाल्यास, उत्तर प्रदेशत भाजपला मोठा फायदा झाला होता. येथे भाजपने एकूण 80 पैकी 62 जागा जिंकल्या होत्या. याशिवाय, भाजपचा मित्रपक्ष अपना दलने दोन जागा जिंकल्या होत्या, बसपाला 10, सपाला पाच तर काँग्रेसला एक जागा मिळाली होती. ओडिशावरही केलं भाष्य -यावेळी, ओडिशा आणि नवीन पटनायक यांच्यासंदर्भात विचारले असता, मोदी म्हणाले, 'भारतातील सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांशी आमचे चांगले संबंध आहेत आणि आम्ही लोकशाहीत वैर ठेवत नाही. आता प्रश्न आहे की, मी माझ्या संबंधांची काळजी करावी की ओडिशाच्या कल्याणाची? मी ओडिशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी स्वतःला समर्पित करण्याचा निर्णय घेतला आहे आणि यासाठी मला माझ्या नात्यांचा त्याग करावा लागला तरी मी करेन. निवडणुकीनंतर मी सर्वांना समजावून सांगेन की, माझे कुणाशीही वैर नाही."
समृद्ध राज्यातील गरीब लोक पाहून वाईट वाटते -मोदी म्हणाले, "ओडिशाकडे प्रचंड नैसर्गिक संसाधने आहेत. एका समृद्ध राज्यातील गरीब लोक पाहून वाईट वाटते. भारतातील समृद्ध राज्यांत ओडिशा आहे. एवढी नैसर्गिक संसाधने आहेत. तसेच, देशातील गरीब लोकांच्या राज्यातही ओडिशा आहे. याला सरकार जबाबदार आहे. यामुळ ओडिशातील लोकांना त्यांचा अधिकार मिळायला हवा. ओडिशाचे भाग्य बदलणार आहे. सरकार बदलत आहे. मी म्हटले आहे की, ओडिशातील सरकारची एक्सपायरी डेट 4 जून आहे आणि 10 जूनला भाजपचा मुख्यमंत्री ओडिशात मुख्यमंत्री पदाची शपथ घेईल."