नवी दिल्ली - राजकीय पक्षांच्या प्रचाराची रंगत वाढत चालली आहे. प्रचारसभांमधून अनेक नेते एकमेकांवर घणाघाती टीका करताना पाहायला मिळत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंड येथील प्रचारसभेत विरोधकांवर निशाणा साधला आहे. पराभवाचं खापर ईव्हीएमवर फोडण्याचा खटाटोप असल्याचा टोला मोदींनी विरोधकांना लगावला आहे. झारखंडमध्ये बुधवारी (24 एप्रिल) एका प्रचारसभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी मोदींनी विरोधकांवर टीका केली आहे.
नरेंद्र मोदी यांनी 'आधी विरोधक माझ्यावर टीका करत होते, पण कालपासून त्यांनी ईव्हीएमवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. असं दिसतंय की पराभवाचं खापर ईव्हीएमवर फोडण्याचं त्यांनी ठरवलं आहे. ज्याप्रमाणे एखादा विद्यार्थी परिक्षेत पेपर चांगला गेला नाही तर पेन नीट चालत नव्हता अशी कारण देतो अगदी त्याप्रमाणे' असं म्हटलं आहे.
झारखंडमधील प्रचारसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रीलंकेत झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख करत 2014 लोकसभा निवडणुकीआधी भारतातही हेच सुरू होतं अशी टीका केली आहे. 'श्रीलंकेत दहशतवाद्यांनी चर्च आणि इतर ठिकाणी कशाप्रकारे दहशतवादी हल्ला केला हे तुम्ही पाहिलं असेल. 2014 लोकसभा निवडणुकीपूर्वी भारतदेखील त्याच परिस्थितीतून जात होता' असं मोदींनी म्हटलं आहे.
कुठेही बोललो की विरोधकांना पहिला शॉक लागतो; नरेंद्र मोदींची टीकापंतप्रधान नरेंद्र मोदी यांची काही दिवसांपूर्वी नाशिकच्या पिंपळगावमध्ये सभा झाली. यावेळी त्यांनी भाजपा सरकारच्या विकासकामांचा आढावा घेतला होता. देशाची सुरक्षा, भ्रष्टाचार, विकास या मुद्यावर मी चर्चा करतो मात्र काहींना विजेचा धक्का आहे त्या ठिकाणी बसतो आणि शिवराळपणा ते करू लागतात. पहिल्या दोन टप्प्यातील मतदानाचा टक्का आणि मिळणारे संदेश हादरवून सोडणारे आहेत, असा इशारा त्यांनी विरोधकांना दिला होता. महागाई थोडी वाढली की काँग्रेस मध्यमवर्गीयांच्या बाजूने उभी राहून एकप्रकारे शेतकरीविरोधी भूमिका घेते व शेतमालाचे दर कोसळले की शेतकऱ्यांना भाव मिळत नाही, असे म्हणून जनतेच्या नावे खडे फोडते. काँग्रेसची ही भूमिका दुटप्पीपणाची असून, शेतकऱ्यांच्या मालाला भाव न देणाऱ्या दलालांना मात्र काँग्रेसने कायमच संरक्षण दिले. रालोआ सरकारने शेतकरी व ग्राहक या दोघांचा विचार करून त्यांच्या आड येणाऱ्या दलालांचा गेल्या पाच वर्षांत बीमोड करण्यासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतल्याचा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे.