नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या मन की बात कार्यक्रमात म्हटले आहे, की चार दिवसांनंतर नवे वर्ष सुरू होणार आहे. पुढच्या वर्षी पुढची मन की बात होईल. देशात नवे सामर्थ्य निर्माण झाले आहे. या नव्या सामर्थ्याचे नाव आहे, 'आत्मनिर्भर'. देशात निर्माण होणाऱ्या खेळण्यांची मागणी वाढली आहे. (PM Narendra Modi, Mann Ki Baat)
पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी सकाळी 11 वाजता 'मन की बात' रेडिओ कार्यक्रमाद्वारे संवाद साधत असतात. आज 27 डिसेंबर रोजी त्यांनी या वर्षातील शेवटच्या 'मन की बात' कार्यक्रमाद्वारे देशवासियांशी संवाद साधला.
पंतप्रधान मोदी म्हणाले, मला अनेक देशवासियांचे पत्र मिळाले आहेत. अधिकांश पत्रांत लोकांनी देशाचे सामर्थ्य आणि देशवासियांच्या एक्याच्या शक्तीचे कौतुक केले आहे. जनता कर्फ्यूसारखा अभिनव प्रयोग पूर्ण जगाला प्रेरणा देणारा ठरला. टाळ्या आणि थाळ्या वाजवून देशानं करोना योद्ध्यांचा सन्मान केला. एकजुट दाखवली, हेदेखील लोकांनी लक्षात ठेवले आहे,” असं मोदी म्हणाले.
मोदी म्हणाले, देशातील सामान्य जनतेने देशाच्या सन्मानार्थ हा बदल अनुभवला आहे. मी देशात आशेचा एक अद्भुत प्रवाहदेखील पाहिला आहे. अनेक आव्हाने आली, संकटे आली, कोरोनामुळे जगातील सप्लाय चेनमध्येही अनेक अडथळे आले. मात्र, प्रत्येक संकटापासून आपण नवा धडा घेतला.
आपल्या वस्तू जागतीक स्तराच्या बनाव्यात -व्होकल फॉर लोकल हा स्वर आता घरा घरात घुमत आहे. त्यामुळे, आपल्या वस्तू जागतिक स्तरावरील असाव्यात हे, आपल्याला निश्चित करायचे आहे. जागतिक स्तरावर जे बेस्ट आहे, ते आपण भारतात तयार करून दाखवू. यासाठी आपल्या उद्योजक सहकाऱ्यांना पुढे यावे लागणार आहे. स्टार्टअपप्सनाही पुढे यावे लागणार आहे.
विशाखापट्टनम येथील व्यंकट मुरलीप्रसाद यांच्या पत्रासंदर्भात बोलताना मोदी म्हणाले, व्यंकट जींनी ते वापरत असलेल्या सर्व दैनंदिन वस्तूंची यादी तयार केली आहे. ते म्हणतात, आपण अज्ञातपणे अशा काही विदेशी वस्तू वापरतो, ज्यांना पर्यायी वस्तू भारतात उपलब्ध आहेत. त्यांनी शपथ घेतली आहे, की ते ज्या वस्तूं भारतात तयार होतील त्याच वस्तूंचा वापर करतील, असेही मोदी म्हणाले. तसेच मोदींनी नव्या वर्षानिमित्त देशवासीयांनी स्वदेशी वस्तू वापरण्याचा संकल्प करण्याचे आवाहन केले आहे.