नवी दिल्ली - दरवर्षीप्रमाणे यंदाही पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतीय लष्काराच्या जवानांसोबत दिवाळी साजरी करणार आहेत. जवानांसोबत दिवाळी साजरी करण्यासाठी मोदी रविवारी (27 ऑक्टोबर) जम्मू-काश्मीरच्या राजौरी सेक्टरमध्ये दाखल झाले आहेत. कलम 370 हटवल्यानंतर पंतप्रधान मोदी पहिल्यांदाच जम्मू-काश्मीरमध्ये आले आहेत. जवानांना दिवाळीच्या शुभेच्छा देऊन मोदी त्यांच्यासोबत काही वेळ घालवणार आहेत. लाइन ऑफ कंट्रोल (एलओसी) जवळ जवानांसोबत मोदी दिवाळी साजरी करणार आहेत.
नरेंद्र मोदी 2014 पासून दरवर्षी जवानांसोबत दिवाळी साजरी करत आहेत. गेल्या वर्षी उत्तराखंडमधील हर्षिल येथील जवानांच्या कॅम्पमध्ये जाऊन मोदी यांनी जवानांची भेट घेतली आणि दिवाळी साजरी केली होती. तसेच, त्यांनी जवानांना दिवाळीच्या शुभेच्छा देत मिठाई खाऊ घातली. तसेच 'तुमच्यामुळे देशाचे नागरिक शांतपणे झोपू शकतात, अशी भावना नरेंद्र मोदी यांनी त्यावेळी व्यक्त केली होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देशवासियांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 'देशवासियांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. प्रकाशाचा हा उत्सव आपल्या सर्वांच्या जीवनात एक नवा प्रकाश घेऊन येवो आणि आपला देश नेहमी सुखी, समृद्ध राहो' असं ट्विट नरेंद्र मोदी यांनी केले आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनीही देशवासियांना दिवाळीच्या खूप शुभेच्छा दिल्या आहेत. 'दिवाळीनिमित्त सर्व देशवासियांना खूप खूप शुभेच्छा. आजच्या दिवशी आपण प्रेम, सहानुभूती आणि एकोप्याचा दीपक प्रज्ज्वलित करून सर्वांच्या जीवनात आनंद आणण्याचा प्रयत्न करूया!' असं ट्विट रामनाथ कोविंद यांनी केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'मन की बात'मध्ये सरदार पटेल आणि देशाच्या एकतेचा उल्लेख करत अयोध्या प्रकरणावर भाष्य केले. सप्टेंबर 2010 मध्ये अलाहाबाद उच्च न्यायालयाचा निकाल आला. त्यावेळी देश एकता आणि अखंडतेच्या बाबतीत किती सतर्क आहे, याची प्रचिती आली. 2010 मध्ये न्यायालयाने राम मंदिर प्रकरणी निकाल दिला. त्यावेळी काहींनी वाचाळपणा केला. मात्र संपूर्ण देशातील जनतेने आनंददायक बदल अनुभवला, असं मोदी 'मन की बात'मध्ये म्हणाले. अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निकालानंतर सरकार, समाज, साधू-संतांनी अतिशय शांतपणे प्रतिक्रिया दिल्या. निकालाचा दिवस जेव्हा जेव्हा मला आठवतो, तेव्हा अतिशय आनंद होतो. त्यावेळी देशाने न्यायालयाच्या निर्णयाचा, प्रतिष्ठेचा सन्मान केला होता. तो क्षण आमच्यासाठी कायम एक उत्तम उदाहरण असेल, असे मोदी म्हणाले. सर्वोच्च न्यायालयात अयोध्या प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाली असून नोव्हेंबरमध्ये निकाल येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर मोदींचे विधान महत्त्वाचे मानले जात आहे.