PM Narendra Modi in West Bengal : कोलकाता : देशात लोकसभा निवडणुकीसाठी दोन टप्प्यातील मतदान झाले आहे. आता तिसऱ्या टप्प्यातील मतदान 7 मे रोजी होणार आहे. या तिसऱ्या टप्प्यासाठी उमेदवारांचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पश्चिम बंगालमधील कृष्णनगर येथील प्रचारसभेला संबोधित केले. यावेळी नरेंद्र मोदींनी पश्चिम बंगालच्या टीएमसी सरकारवर जोरदार निशाणा साधला. टीएमसीने हे समजून घेतले पाहिजे की, ते काहीही झाले तरी सीएएची अंमलबजावणी थांबवू शकत नाहीत, असे नरेंद्र मोदी म्हणाले.
सीएएच्या माध्यमातून मी भारतीय नागरिकत्व मिळवणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला खात्री देतो की, त्यांना लवकरच केंद्रीय उपक्रमाचा लाभ मिळेल. टीएमसी बंगालचे गौरवशाली नाव खराब करीत आहे. टीएमसीला संविधानाचे पालन करण्याचे निर्देश देण्यासाठी न्यायालयांना वारंवार हस्तक्षेप करावा लागला आहे, असे नरेंद्र मोदी म्हणाले. तसेच, संदेशखळी प्रकरणावरून सुद्धा नरेंद्र मोदींनी टीएमसीच्या नेत्यांवर निशाणा साधला. ते म्हणाले की, संदेशखळीमध्ये काय घडत आहे हे टीएमसीच्या नेत्यांना नेहमीच ठाऊक होते, परंतु गुन्हेगार त्यांच्यासाठी मालमत्ता असल्याने त्यांनी त्याच्यावर कधीही कारवाई केली नाही.
याचबरोबर, केंद्र सरकार लोकांना मोफत रेशन आणि आरोग्याच्या सुविधा देत आहे. मात्र, टीएमसी बंगालमध्ये आमचा उपक्रम राबवत नाही, त्यामुळे तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागत आहे, असे नरेंद्र मोदी म्हणाले. तसेच, बंगालमध्ये आमच्या माजी सैनिकांवर अन्याय होत आहे. या आव्हानात्मक काळात भाजपा तुमच्या पाठीशी उभा आहे आणि तुमचे जीवन सुकर करण्यासाठी माझ्या तिसऱ्या कार्यकाळात केंद्र सरकार तुम्हाला सर्वतोपरी मदत करेल, असे आश्वासन सुद्धा नरेंद्र मोदी यांनी दिले.