पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी राजस्थानमधील सीकरमध्ये आयोजित सभेला संबोधित केले. यासोबतच नरेंद्र मोदींनीराजस्थानधील विधानसभा निवडणुकीचा बिगुलही वाजवला. नरेंद्र मोदी यांनी येथील मंचावरून अशोक गेहलोत यांच्या सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. लाल डायरीच्या मुद्द्यावरून नरेंद्र मोदींनी या डायरीत गेहलोत सरकारच्या काळ्या कारनाम्यांची नोंद असल्याचे सांगितले. याशिवाय, आपल्याला भ्रष्टाचार, परिवारवाद आणि तुष्टीकरण सोडण्याची गरज आहे. त्यामुळे QUIT INDIA हा नाराच देशाला वाचवेल, असे म्हणत विरोधकांच्या इंडिया नावावरून नरेंद्र मोदींनी निशाणा साधला.
याचबरोबर, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या प्रोटोकॉलच्या वादादरम्यान नरेंद्र मोदी म्हणाले की, अशोक गेहलोत या कार्यक्रमाला येणार होते. पण काही दिवसांपासून आजारी आहेत. त्यांच्या पायाला दुखापत झाली आहे, त्यामुळे ते येऊ शकले नाहीत. मी त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करतो. दरम्यान, नरेंद्र मोदी यांनी राजस्थानमधील सीकरमधून देशभरातील साडेआठ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात १७ हजार कोटी रुपये ट्रान्सफर केले.
यावेळी नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. म्हणाले की, तुम्ही लाल डायरीबद्दल ऐकले आहे, असे म्हटले जाते की, या लाल डायरीमध्ये काँग्रेस सरकारच्या काळ्या कृत्यांचे काळे पुस्तक आहे. लाल डायरीची पाने उघडली तर गोष्टी व्यवस्थित होतील, असे लोक म्हणत आहेत. लाल डायरीचे नाव ऐकताच काँग्रेस नेत्यांची बोलती बंद होते. काँग्रेसने आपल्या वर्चस्वासाठीच्या भांडणात आपला कार्यकाळ वाया घालवला, असे नरेंद्र मोदी यांनी सांगितले.
केंद्रातील भाजप सरकार राजस्थानच्या लोकांच्या कल्याणासाठी काम करत आहे, आम्ही घरे बांधून देशातील जनतेला करोडपती बनवत आहोत, आमच्या सरकारने ही हमी पूर्ण केली आहे, असे नरेंद्र मोदी म्हणाले. तसेच, राजस्थान सरकारच्या लोकांवरच पेपर लीक केल्याचा आरोप आहे, हे सरकार तरुणांच्या विरोधात आहे. त्यांच्यापासून राज्य वाचवायचे असेल, तर काँग्रेसला हटवावे लागेल. राजस्थानात कधी गोळीबार आणि दगडफेक सुरू होईल, कर्फ्यू कधी लागू होईल, हे कोणालाच माहीत नाही, असे म्हणत नरेंद्र मोदींनी काँग्रेस सरकारवर निशाणा साधला.
विरोधकांना नाव बदलून लुटायचे आहे - नरेंद्र मोदीनरेंद्र मोदींनी सीकर रॅलीतून संपूर्ण विरोधकांच्या आघाडीवर सुद्धा हल्लाबोल केला. नरेंद्र मोदी म्हणाले, देशाचे शत्रू जी पद्धत अवलंबतात, तीच पद्धत विरोधक अवलंबतात. इंडिया हे नाव ईस्ट इंडिया कंपनीतही होते, तेव्हा भारताला लुटण्यासाठी इंडिया लिहिले गेले होते. सिमीचे नावही इंडिया होते, पण दहशतवादी हल्ले करणे हे त्यांचे ध्येय होते. इंडिया नावामागे या लोकांना यूपीएची काळी कृत्ये लपवायची आहेत. त्यांना भारताची काळजी असती, तर त्यांनी सर्जिकल स्ट्राईकला विरोध केला नसता. दहशतवादी हल्ला झाला, तेव्हा या लोकांनी मौन बाळगले होते. स्वातंत्र्यापूर्वी महात्मा गांधींनी 'इंग्रजांनो भारत छोडो' हा नारा दिला होता, आजच्या काळातही असाच नारा देण्याची गरज आहे. आज आपल्याला भ्रष्टाचार, परिवारवाद आणि तुष्टीकरण सोडण्याची गरज आहे. त्यामुळे QUIT INDIA हा नाराच देशाला वाचवेल, असे नरेंद्र मोदी म्हणाले.