मुंबई:काँग्रेसचे राज्यसभा खासदार राजीव सातव यांचे निधन झाले आहे. पुण्यातील जहाँगीर रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शुक्रवारी रात्री अचानक त्यांची प्रकृती खालावली होती. त्यानंतर, डॉक्टरांनी त्वरीत औषधोपचार सुरू केले. शनिवारी दिवसभरात सुधारणा होत असल्याचे सांगण्यात आले. मात्र, कोरोनानंतर आजाराशी त्यांची झुंज अपयशी ठरली. त्यांच्या निधनानंतर देशभरातून दु:ख व्यक्त करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्विटरवरून राजीव सातव यांच्या निधनाबाबत शोक व्यक्त करत भावना व्यक्त केल्या आहेत. (pm narendra modi react over rajeev satav sad demise)
राजीव सातव, संसदेतील चांगला मित्र गमावल्याचे तीव्र दुःख आहे. राजीव सातव आगामी काळातील सक्षम उभरतं नेतृत्व होतं. त्यांच्या कुटुंबीय, मित्र, समर्थक यांच्यांप्रती संवदेना व्यक्त करतो. ओम शांती, या शब्दांत पंतप्रधान मोदी यांनी एक ट्विट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
तरुण, आश्वासक आणि अभ्यासू नेतृत्वाला महाराष्ट्र मुकला
काँग्रेस नेते राजीव सातव यांच्या निधनाचे वृत्त अतिशय धक्कादायक आणि दुःखद आहे. तरुण, आश्वासक आणि अभ्यासू नेतृत्वाला महाराष्ट्र मुकला आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. या कठीण प्रसंगी हे दुःख सहन करण्याची शक्ती त्यांच्या कुटुंबियांना प्राप्त होवो, ही प्रार्थना करतो! ॐ शान्ति, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
लस हाच उपाय, भारतात ‘इतक्या’ कोटी नागरिकांचे लसीकरण आवश्यक; तज्ज्ञांचे मत
राजकारणाचा सुसंस्कृत चेहरा
काँग्रेसचे युवा नेते, खासदार राजीव सातव यांच्या निधनाने महाराष्ट्राने, देशाने एक अभ्यासू, कार्यकुशल, आश्वासक नेतृत्व गमावले आहे. काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांचे मित्र आणि विश्वासू सहकारी असलेल्या राजीव सातव यांचे सर्व पक्षांच्या नेत्यांशी, कार्यकर्त्यांशी जवळिकीचे, मित्रत्वाचे, सौहार्दाचे संबंध होते. राजीव सातव हे भारतीय राजकारणाचा सुसंस्कृत चेहरा होते. त्यांच्या निधनाने जगन्मित्र हरपला आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत.
राजकारणातला देवमाणूस गेला; विजय वडेट्टीवार यांना अश्रु अनावर
दरम्यान, राजीव सातव यांच्या पार्थिवावर मूळगावी कलमदोडी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. राजीव सातव यांचे पार्थिव पुण्यातून हिंगोलीच्या दिशेने रवाना झाले आहे. सातव यांच्या पार्थिवावर त्यांचे मूळगाव असलेल्या हिंगोली जिल्ह्यातील कळनमुरी याठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत, अशी माहिती राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी दिली.