PM Narendra Modi: हिमाचल प्रदेश आणि गुजरात विधानसभा निवडणुकांचे निकाल जवळपास स्पष्ट झाले आहेत. हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसने बाजी मारली असून, गुजरातमध्ये भाजपने ऐतिहासिक विजय मिळवल्याचे चित्र आहे. या दोन्ही राज्यातील निकाल भाजपसाठी ‘कहीं खुशी, कहीं गम’ असल्याचे सांगितले जात आहे. गुजरातमधील प्रचंड विजयाबाबत पंतप्रधान मोदींनी पक्ष कार्यकर्ते आणि मतदारांचे आभार मानले आहेत.
गुजरातमधील विजय साजरा करण्यासाठी भाजपच्या दिल्लीतील मुख्यालयात मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जमले होते. यावेळी कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला. कार्यकर्त्यांच्या या आनंदात पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, अमित शाह, राजनाथ सिंह यांच्यासह अनेक बडे नेते सहभागी झाले होते. यावेळी पंतप्रधान मोदींनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. भाजपला लोकांनी मत दिले, कारण भाजपमध्ये मोठे आणि कठोर निर्णय घेण्याची क्षमता आहे. भाजपला मिळणारे जनतेचे समर्थनच हेच दाखवतोय की, घराणेशाहीविरोधात लोकांचा राग वाढत आहे. गुजरातच्या जनतेने रेकॉर्डब्रेक मते दिली आहे. गुजरातमध्ये एक कोटीपेक्षा अधिक मतदारांनी मतदान केले, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
हिमाचल प्रदेशमध्ये भाजप केवळ एका टक्क्याने मागे राहिला
हिमाचल प्रदेशमध्ये एका टक्क्याने आम्ही मागे राहिलो. परंतु, त्या राज्याच्या विकासासाठी शंभर टक्के कटिबद्ध राहू. आम्ही यापुढे हिमाचलच्या हिताचे मुद्दे मांडत राहू. हिमाचलमध्ये सत्तेत आलेल्या पक्षाचे आम्ही अभिनंदन करतो. राज्याच्या विकासासाठी आम्ही त्यांच्यासोबत आहोत. विरोधक म्हणून आम्ही आमची योग्य भूमिका पार पाडू, असे आश्वासन पंतप्रधान मोदी यांनी यावेळी दिले.
दरम्यान, देशासमोर आव्हाने असतात, तेव्हा जनतेचा विश्वास भाजपवरच असतो, हा स्पष्ट संदेश या निकालातून मिळाला आहे. तरुणांनी मोठ्या संख्येने भाजपला मतदान केले आहे. तरुणांनी आमच्यावर विश्वास दाखवला. देश समृद्ध असेल तर देशवासी निश्चितपणे समृद्ध होईल, यात शंका नाही, यात शंका नाही. भाजपला मिळालेला जनसमर्थन हे नव्या भारताच्या आकांक्षांचे प्रतिबिंब आहे. भाजपला मिळालेला पाठिंबा हे तरुणांच्या विचारांचे प्रकटीकरण आहे. गरीब, शोषित, वंचित, आदिवासींच्या सक्षमीकरणासाठी भाजपला हा जनाधार मिळालेला आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी नमूद केले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"