PM Modi First Reaction On Ram Lalla Darshan: २२ जानेवारी २०२४ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येत राम मंदिराचे लोकार्पण केले. रामललाच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा विधी करण्यात आला. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ११ दिवसांचे विशेष व्रताचरणही केले होते. यंदाची रामनवमी अयोध्या तसेच देशवासीयांसाठी विशेष असणार आहे. रामललाचे दर्शन घेण्यासाठी लाखो भाविक हजेरी लावू शकतात, असे सांगितले जात आहे. तत्पूर्वी, रामललाचे सुकुमार रुप सर्वप्रथम पाहिल्यावर मनात नेमके काय भाव आले, याविषयी पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
राम मंदिराच्या लोकार्पणावेळी गाभाऱ्यात गेल्यावर रामललाचे लोभस स्वरुप पाहून मनात नेमक्या काय भावना दाटल्या, यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अद्भूत किस्सा सांगितला. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राम मंदिर आणि रामलला मूर्तीबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावर बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, रामललासमोर जाऊन उभा राहिलो, तेव्हा सर्वांत पहिल्यांदा माझी नजर प्रभू श्रीरामांच्या चरणाकडे गेली. त्यानंतर दुसरी नजर रामललाच्या डोळ्यांकडे गेली. मी एकदम स्तब्ध झालो. माझी नजर तिथेच खिळली. काही क्षण माझे लक्ष फक्त रामललाकडे होते. एक क्षण असे वाटले की, रामलला मलाच पाहत आहेत. रामलला मला सांगत आहेत की, आता सुवर्णयुग सुरू झाला आहे. भारताचे दिवस आले आहेत. भारत पुढे जात आहे. मी अनुभवत असलेली ही भावना शब्दातीत आहे. व्यक्त करणे शक्य नाही, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
ती तर ईश्वरीच इच्छा, यात मानवाची काही भूमिका दिसत नाही
लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राम मंदिराचे लोकार्पण करण्यात आले. काम अर्धवट असताना राम मंदिर खुले करण्याची एवढी घाई का करण्यात आली, असे आरोप विरोधकांकडून केले गेले. यावर पंतप्रधान मोदी यांनी स्पष्ट शब्दांत उत्तर दिले. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आला, त्यानंतरच राम मंदिर उभारणीला सुरुवात झाली. त्यासाठी काम करणारे लोक वेगळे होते. वेगळा ट्रस्ट होता. कदाचित ती वेळ देवानेच ठरवलेली असेल. ती तर ईश्वरीच इच्छा असेल. नाहीतर सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय येणे, त्यानंतर जागेची निश्चिती करून राम मंदिराचे बांधकाम सुरू होणे, यात कोणत्याही माणसाची भूमिका दिसत नाही. या घटना एकामागून एक घडत गेल्या. नेमके २०२४ च्या लोकसभा निवडणुकांपूर्वीच हे सगळे घडेल, असे कदाचित निकाल देणाऱ्या व्यक्तीला माहिती नसेल, असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.
दरम्यान, अयोध्येतील श्रीरामजन्मभूमि तीर्थक्षेत्र ट्रस्टकडून निमंत्रण आले होते. पंतप्रधान म्हणून मला अनेक आमंत्रणे, निमंत्रणे येत असतात. राम मंदिराचे निमंत्रण आल्याचे पाहून मला धक्का बसला. तेव्हापासूनच मी आध्यात्मिक वातावरणात तल्लीन होऊ लागलो. ते व्यक्त करायला माझ्याकडे शब्द नाहीत. मी ठरवले की, ११ दिवस व्रताचरण करेन. दक्षिणेतील प्रभू श्रीरामांशी संबंधित ठिकाणी वेळ घालवीन, असे पंतप्रधान मोदी यांनी नमूद केले.