PM Narendra Modi News ( Marathi News ): संसद सुरक्षा त्रुटी, खासदारांचे निलंबन यांवरून विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. गृहमंत्री आणि पंतप्रधान मोदी यांनी दोन्ही सभागृहात येऊन निवेदन, स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी केली आहे. तर दुसरीकडे, भारतीय संविधानात मोठी दुरुस्ती करण्यात येण्याबाबत देशभरात चर्चा सुरू आहे. मात्र, यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट शब्दांत भाष्य केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घटनादुरुस्तीबाबत देशात सुरू असलेल्या चर्चेला पूर्णविराम दिला आहे. घटनादुरुस्तीची कोणतीही चर्चा निरर्थक आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी स्पष्ट केले. तसेच सरकारने लोकसहभागातून उचललेली सर्वांत परिवर्तनकारी पावले उचलली आहेत, असे पंतप्रधान मोदी यांनी नमूद केले. एका मुलाखतीत बोलताना पंतप्रधान मोदी यांनी देशात केंद्र सरकारकडून करण्यात आलेल्या बदलांबाबत माहिती दिली. स्वच्छ भारत अभियान, शौचालय मोहिमेपासून जवळपास एक अब्ज लोकांना एका डिजिटल प्लॅटफॉर्मवर आणण्यापर्यंतच्या प्रवासाबाबत पंतप्रधान मोदी यांनी सविस्तरपणे सांगितले.
लोकसभा निवडणुकीत विजयाबद्दल पूर्ण विश्वास आहे
देश उंच भरारी घेण्यास सज्ज आहे. पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत विजयाबद्दल पूर्ण विश्वास आहे. फक्त ही उंच भरारी जलदगतीने व्हायला हवी. देशात विकासाला गती देण्यासाठी भाजपा सर्वोत्तम पक्ष असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे. केंद्र सरकारने सर्वसामान्यांच्या जीवनात आणलेल्या बदलांचा उल्लेख पंतप्रधान मोदी यांनी केला. लोकांच्या आकांक्षा १० वर्षांपूर्वीच्या आकांक्षापेक्षा वेगळ्या आहेत, असे मोदी म्हणाले.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या परराष्ट्र धोरणाच्या दृष्टिकोनाचा तपशीलवार उल्लेख केला. मोदी यांनी या दृष्टिकोनाला 'मिक्स अँड मॅच' असे संबोधले. जग एकमेकांशी जोडलेले आहे आणि एकमेकांवर अवलंबूनही आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.