काँग्रेस: प्रजासत्ताक दिनानिमित्तकाँग्रेसनं पंतप्रधान नरेंद्र मोदींना विशेष भेट पाठवली होती. मात्र पंतप्रधानांनी भेट स्वीकारली नसल्याचा दावा काँग्रेसनं केला आहे. या संदर्भातला एक स्क्रीनशॉट काँग्रेसनं ट्विटर आणि फेसबुकवर शेअर केला आहे. काँग्रेसनं अॅमेझॉनच्या माध्यमातून मोदींना संविधानाची प्रत पाठवली होती. देशाचं विभाजन करण्याच्या कामातून तुम्हाला वेळ मिळाल्यावर कृपया संविधान वाचा, असा संदेश काँग्रेसनं मोदींना संविधानाची प्रत पाठवताना दिला होता. प्रिय पंतप्रधान, संविधानाची प्रत थोड्याच वेळात तुमच्यापर्यंत पोहोचेल. देशाची विभागणी करण्याच्या कामातून वेळ मिळाल्यावर आपलं संविधान नक्की वाचा, असं आवाहन करणारं ट्विट काँग्रेसनं कालच केलं होतं. अॅमेझॉनच्या माध्यमातून काँग्रेसनं मोदींना संविधानाची प्रत पाठवली होती. ती काल मोदींकडे पोहोचणार होती. याची माहिती देणारा अॅमेझॉनचा स्क्रीनशॉटदेखील काँग्रेसनं शेअर केला होता. आज दुपारी काँग्रेसनं ट्विट करत मोदींनी संविधानाची प्रत नाकारल्याची माहिती दिली. 'प्रिय देशवासीयांनो, आम्ही प्रयत्न केला. मात्र मोदींना संविधानात रस नाही. आता करायचं तरी काय?', असा सवाल काँग्रेसनं ट्विटमधून उपस्थित केला. या ट्विटसोबतदेखील काँग्रेसनं एक स्क्रीनशॉट शेअर केला. 'तुम्ही पाठवलेलं पॅकेज डिलेव्हरीच्या पत्त्यावर स्वीकारण्यात न आल्यानं किंवा ऑर्डर रद्द करण्यात आल्यानं विक्रेत्याकडे परत जात आहे,' असा मजकूर या स्क्रीनशॉटमध्ये आहे.