नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात सुरू असलेल्या लसीकरण कार्यक्रमासंदर्भात शनिवारी समीक्षा बैठक घेतली. या बैठकीला कोरोना टास्क फोर्स आणि पंतप्रधान कार्यालयाचे अधिकारीही उपस्थीत होते. यावेळी पंतप्रधान मोदींनी, आतापर्यंत टोचल्या गेलेल्या लशी, येणाऱ्या काळात लशींची उपलब्धता, राज्यांना लशींचा पुरवठा आणि लसीकरणाच्या कार्यक्रमासंदर्भात संपूर्ण माहिती घेतली. (PM Narendra Modi reviews vaccination program and give targets to vaccinate whole country till december)
देशात 21 जूनपासून सुरू झालेल्या मोफत लसीकरण अभियानात रोज 70 लाख या प्रमाणे 5 दिवसांत तब्बल 3.5 कोटीहून अधिक लोकांना लस टोचण्यात आली. 21 जूनला लसीकरणाच्या नव्या टप्प्याला सुरुवात झाली, तेव्हा एकाच दिवसात तब्बल 85 लाखहून अधिक लोकांना लस टोचण्यात आली होती. याच दिवशी मध्यप्रदेशात विक्रमी जवळपास 17 लाख लोकांना लस टोचली गेली होती. उत्तर प्रदेशानेही जून महिन्यातील लसीकरणाचे लक्ष्य 6 दिवस आधीच पूर्ण केले होते. मध्य प्रदेशात आजही वेगाने लसीकरण सुरू आहे.
सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्राने लशींची संपूर्ण व्यवस्था आपल्या हाती घेतल्यानंतर, आता याला गती देण्याचा विचार करत आहे. यावर्षी डिसेंबरपर्यंत देशातील सर्व नागरिकांचे लसीकरणाचे लक्ष्य वेळेच्या आत साध्य करण्याची सरकारची इच्छा आहे. यासाठी सरकार भाजप संघटनेचाही वापर करणार आहे. याशिवाय, पंतप्रधान मोदी या परिस्थितीत कोरोनाचे नवे व्हेरिएंट आणि त्यांच्याशी संबंधित केसेससंदर्भातही सातत्याने अपडेट घेत आहेत.
देशातील लसीकरणाची स्थिती -केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी दिलेल्या माहितीनुसार, देशात आतापर्यंत जवळपास 31 कोटीहून अधिक लोकांना लस टोचण्यात आली आहे. लसीकरण अभियानाच्या दुसऱ्या टप्प्याला 21 जूनपासून सुरूवात झाली होती आणि शुक्रवारी 60 लाखहून अधिक लोकांना लस टोचण्यात आली.
मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी 18-44 वयोगटातील 35.9 पेक्षा जास्त लोकांना लशीचा पहिला डोस, तर 77,664 लोकांना दुसरा डोस देण्यात आला आहे. लसीकरण अभियानाच्या तिसऱ्या टप्प्याच्या सुरुवातीपासून ते आतापर्यंत देशात या वयोगटातील 7.87 कोटी लोकांना लशीचा पहिला डोस आणि 17.09 लाख लोकांना दुसरा डोस देण्यात आला आहे.