PM Narendra Modi ( Marathi News ) : लोकसभा निवडणुकांची घोषणा होण्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून देशभरात विविध विकासकामांच्या उद्घाटनांचा धडाका सुरू आहे. भाजपने यंदाच्या लोकसभा निवडणुकीत दक्षिणेतील तामिळनाडू या राज्यावरही विशेष लक्ष केंद्रित केलं आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील आपल्या समर्थकांमध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी कोयंबतूर इथं नरेंद्र मोदी यांच्या रोड शोचं आयोजन करण्यात येणार होतं. मात्र स्थानिक प्रशासनाने मोदींच्या रोड शोला परवानगी नाकारल्याचा दावा भाजपकडून करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भाजपने गुरुवारी कोयंबतूर शहर पोलिसांना एक अर्ज देत १८ मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या साडेतीन किलोमीटरच्या रोड शोसाठी परवानगी मागितली होती. मात्र कोयंबतूर पोलीस प्रशासनाने विविध कारणं देत या रोड शोला परवानगी देणं टाळलं आहे.
कोणती कारणे दिली?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रोड शोला परवानगी नाकारताना प्रशासनाने चार मुख्य कारणे दिल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.
१. सुरक्षिततेचा धोका२. कोयंबतूरचा धार्मिक तणावाचा इतिहास३. सर्वसामान्य नागरिकांना होणार त्रास४. रोड शोच्या मार्गावर अनेक शाळा असल्याने विद्यार्थ्यांना होणारा त्रास
दरम्यान, भाजपकडून आयोजित करण्यात आलेला या रोड शोचा शेवट आरएस पुरम इथं होणार होता. याच आरएस पुरम इथं १९९८ साली बॉम्बस्फोट झाले होते. तसंच कोयंबतूर शहराचा इतिहासही सामाजिकदृष्ट्या संवेदनशील राहिला असल्याने कोणत्याच राजकीय पक्षाला रोड शोची परवानगी देण्यात आलेली नाही.