जयपूर : देशातील विकासाशी संबंधित मुख्य मुद्यांपासून लक्ष विचलित करण्याचे काम काही पक्षांची इकोसिस्टिम करत आहेत. मात्र, भाजपाच्या नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी अशा पक्षांच्या जाळ्यात न अडकता विकास आणि राष्ट्रीय हिताशी संबंधित मुद्यांवर लक्ष केंद्रित करावे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. आगामी २५ वर्षांसाठी लक्ष्य निश्चित करा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
भाजपाच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांच्या तीन दिवसीय बैठकीच्या उद्घाटन सत्राला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संबोधित करताना पंतप्रधान मोदी यांनी विरोधी पक्षांवर आरोप केला की, आपल्या राजकीय स्वार्थासाठी ते तणावाच्या लहान घटनांच्या माध्यमातून समाजात विष कालवत आहेत. कधी जातीच्या तर कधी प्रादेशिकतेच्या मुद्यांवर ते लोकांना भडकावित आहेत.
मोदी म्हणाले की, स्वातंत्र्यानंतर घराणेशाहीमुळे देशाचे मोठे नुकसान झाले आहे. घराणेशाही जपणारे पक्ष आजही देशाला मागे घेऊन जात आहेत. लोकशाहीसाठी ही घातक परंपरा असल्याचे सांगत ते म्हणाले की, जर लोकशाही वाचवायची असेल तर भाजपाला घराणेशाहीविरुद्ध सातत्याने संघर्ष करावा लागणार आहे. ते म्हणाले की, भाजपाने विकासाचे राजकारण केले आहे आणि आज तोच आज राजकारणाचा मुख्य प्रवाह झाला आहे. मोदी म्हणाले की, रालोआच्या ८ वर्षाच्या काळात संतुलित विकास, सामाजिक न्याय आणि सुरक्षा यांना प्राधान्य दिले.