नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी भाजप मुख्यालयात कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी लोकसभा निवडणुकीच्या निकालाबाबत नाराजी असलेल्या कार्यकर्त्यांचा उत्साह नरेंद्र मोदींनी वाढवला. दु:खी कशाला व्हायचं, आपण खूप चांगलं काम केलं आहे. आता आपल्याला पुढं जायला हवं, असं नरेंद्र मोदींनी कार्यकर्त्यांना सांगितलं. तसंच, २०२४ च्या लोकसभा निवडणुकीतील अनुभव आणि भाजपच्या संघर्षाची आठवण करून कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करण्याचा प्रयत्न नरेंद्र मोदींनी केला.
यादरम्यान नरेंद्र मोदींनी लोकसभा निवडणुकीसाठी गुंतलेल्या सर्व कार्यकर्त्यांसोबत चर्चा केली. नरेंद्र मोदींनी भाजप कार्यालयात जवळपास दोन तासांपेक्षा जास्त वेळ कार्यकर्त्यांसोबत चर्चा केली. यावेळी त्यांनी भाजप कार्यालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचीही भेट घेतली. भाजप कार्यालयात पोहोचलेल्या पंतप्रधान मोदींचं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी स्वागत केलं. दरम्यान, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीनंतरही नरेंद्र मोदींनी पक्षाच्या मुख्यालयात जाऊन कार्यकर्त्यांची भेट घेतली होती.
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला पूर्ण बहुमत मिळालं नाही. पक्षाला केवळ २४० जागांवर समाधान मानावे लागले. या निवडणुकीच्या निकालाबाबत भाजप कार्यकर्त्यांमध्ये नाराजी दिसून येत होती. त्यामुळं कार्यकर्त्यांशी संवाद साधताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कार्यकर्त्यांचं खूप कौतुक केलं. तसंच, तुमच्या मेहनतीत कोणतीही कमतरता नसल्याचं नरेंद्र मोदी म्हणाले. निकालामुळे आपल्याला निराश होण्याची गरज नाही. पूर्ण मेहनत घेऊन पुढे जायला हवं. तुम्ही सर्वांनी छान काम केलं आहे, असंही नरेंद्र मोदी म्हणाले.
दरम्यान, याआधी उत्तर प्रदेशात भाजपच्या कार्यकारिणीच्या बैठकीतही मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कार्यकर्त्यांना प्रोत्साहन दिलं होतं. बॅकफूटवर येण्याची गरज नाही, त्यापेक्षा पूर्ण उत्साहानं पुढं जायला हवं. विरोधी पक्षांनी सर्व खोटा प्रचार करूनही आम्हाला इतक्या जागा मिळाल्या आहेत, असं योगी आदित्यनाथ यांनी भाजप कार्यकर्त्यांना सांगितलं होतं. तसंच, पक्षाला पुढं नेण्यासाठी आपण दुप्पट उत्साहानं काम करू, असंही योगी आदित्यनाथ म्हणाले होते.