कोरोना महामारी आणि युक्रेन युद्धासारखी आव्हानं देशाला आत्मनिर्भर व्हायला शिकवतात - PM मोदी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2022 01:58 AM2022-03-21T01:58:14+5:302022-03-21T01:58:46+5:30
भारतात तयार होणाऱ्या उत्पादनांना प्रोत्साहन देण्याचे आवाहनही यावेळी नरेंद्र मोदी यांनी जनतेला केले.
कोरोना महामारी आणि रशिया-युक्रेन युद्धासारखी आव्हानं पाहता, देशाला आत्मनिर्भर बनविणे अत्यंत आवश्यक आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. एवढेच नाही तर भारतात तयार होणाऱ्या उत्पादनांना प्रोत्साहन देण्याचे आवाहनही यावेळी नरेंद्र मोदी यांनी जनतेला केले. तसेच, देशातील उत्पादने खरेदी केल्याने देश बलशाली होऊ शकतो, असेही पंतप्रधान म्हणाले. ते एका कार्यक्रमात बोलत होते.
"सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास" -
पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वामीनारायण गुरुकुल विश्वविद्या प्रतिष्ठान (एसजीवीपी) च्या गुरुदेव शास्त्रीजी महाराज यांच्या जीवनावरील पुस्तक 'श्री धर्मजीवन गाथा' च्या सहा खंडांच्या प्रकाशन समारंभावेळी बोलत होते. ते म्हणाले त्यांची 'सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास' ही घोषणा शास्त्रीजी महाराजांच्या 'सर्वजन हिताय'च्या आवाहनाने प्रेरित आहे.
जग नव्या आव्हानांचा सामना करतंय -
मोदी म्हणाले, त्यांचे शिष्य माधवप्रियदासजी स्वामी यांनी लिहिलेले पुस्तक हे त्यांचे जीवन आणि शिकवणीच्या रुपात वाचकांसाठी प्रेरणादायी ठरेल. आज जागातीक परिस्थिती पाहता, प्रत्येक जन नव्या संकटाचा सामना करत आहे. आपण कोरोना व्हायरस अनुभवला आणि आता युक्रेन-रशिया युद्ध. आजच्या जगात, केव्हा काय होईल आणि त्याचा आपल्यावर काय परिणाम होईल, याचा अंदाज लावणे कठीण आहे. यावेळी मोदींनी आत्मनिर्भर भारतवरही भाष्य केले.