नवी दिल्ली: अनाथांसाठी सेवाकार्य करणाऱ्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या व पद्मश्री पुरस्काराने सन्मानित सिंधुताई सपकाळ (Sindhutai Sapkal) यांचे मंगळवारी रात्री ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. सिंधुताईंच्या निधनाने हजारो अनाथ बालकांची माय हरपली असून, माईंच्या मुलांवर शोककळा पसरली आहे. देशाचे पंतप्रधाननरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी भावूक शब्दांत सिंधुताईंना श्रद्धांजली वाहिली आहे.
सिंधुताई सपकाळ यांचे हृदयविकाराच्या झटक्याने पुण्यातील खासगी रुग्णालयात निधन झाले. हर्नियाच्या शस्त्रक्रियेनंतर फुफ्फुसात संसर्ग झाल्याने त्यांच्यावर महिन्याभरापासून उपचार सुरू होते. त्यांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्र शोकाकूल झाला आहे. पंतप्रधान मोदींनी एक ट्विट करत सिंधुताईंच्या निधनावर तीव्र शोक व्यक्त केला आहे. सामाजिक कार्याचा सन्मान म्हणून सिंधुताई सपकाळ यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. तो फोटोही पंतप्रधान मोदींनी शेअर केला आहे.
अनेक अनाथ मुलांच्या त्या आधार बनल्या
डॉ. सिंधुताई सपकाळ यांचे समाजसेवेतील योगदान खूप मोठे आहे. त्यासाठी त्या सदैव स्मरणात राहतील. अनेक अनाथ मुलांच्या त्या आधार बनल्या. त्यांना सन्मार्ग दाखवला. त्यांचे आयुष्य घडवले. सिंधुताईंमुळे हजारो मुले चांगले, दर्जेदार जीवन जगत आहेत. उपेक्षित समाजासाठीही त्यांनी भरीव असे काम केले. त्यांच्या निधनाने मला व्यक्तीश: अतीव दु:ख झाले आहे. त्यांचे कुटुंबीय, हितचिंतक यांच्या दु:खात मी सहभागी आहे. ॐ शांती, असे पंतप्रधान मोदी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
समाजाप्रती असलेले त्यांचे हे योगदान खूप मोठे
सिंधुताई सपकाळ यांच्या निधनाची बातमी समजली. त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली. पद्मश्री पुरस्काराने सन्मानित सिंधुताई यांनी अनेक खडतर प्रसंगाना तोंड देत हजारो अनाथ मुलांचा सांभाळ केला. समाजाप्रती असलेले त्यांचे हे योगदान खूप मोठे आहे. ईश्वर दिवंगत आत्म्यास शांती देवो. ॐ शांती, या शब्दांत केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनीही सिंधुताई सपकाळ यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला.