पटना : चौकीदार चौर नहीं चौकन्ना है, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर पलटवार केला आहे. बिहारमधील पटना येथील गांधी मैदानात आयोजित सभेत नरेंद्र मोदी बोलत होते. यावेळी काँग्रेससह विरोधकांवर हल्लाबोल केला.
'सर्व चौकीदार हे काही चोर नाहीत, पण फक्त 'देशाचा चौकीदार' चोर आहे,' अशी बोचरी टीका अध्यक्ष राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर शनिवारी केली होती. यावर नरेंद्र मोदी यांनी चौकीदार चोर नही चौकन्ना है, देशाला लुटणारे चौकीदारामुळे हैराण आहेत, असे सांगत राहुल गांधी यांच्यावर पलटवार केला.
याचबरोबर, गेल्या महिन्यात भारतीय हवाई दलाने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांवर मोठी कारवाई केली. या कारवाईसंदर्भात पुरावे मागणाऱ्यांवर नरेंद्र मोदी यांनी जोरदार टीका केली. काँग्रेस आणि त्यांचे मित्रपक्ष भारतीय सैन्याचं खच्चीकरण कशासाठी करत आहेत? ज्या विधानांमुळे आपल्या शत्रूला फायदा होतो अशी विधाने त्यांच्याकडून का केली जात आहेत? असा सवाल करत नरेंद्र मोदींनी विरोधक सैन्याच्या खच्चीकरणाचा प्रयत्न करत असल्याचे सांगितले. तसेच, आता भारत आपल्या वीर जवानांच्या बलिदानावर गप्प बसत नाही, तर ‘चुन चुन के बदला लेता हैं’ असेही नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले.
दरम्यान, नरेंद्र मोदींच्या या या सभेला मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यासह मोठे नेते उपस्थित होते. दहा वर्षांनंतर प्रथमच नरेंद्र मोदी आणि नितीश कुमार निवडणुकीच्या प्रचारासाठी एका मंचावर आले होते. यावेळी नरेंद्र मोदी यांनी नितीश कुमार यांच्या कामगिरीवर स्तुतिसुमनं उधळली.
एनडीएतून नीतीश कुमार 2013 मध्ये बाहेर पडले होते...2014च्या लोकसभा निवडणुकांच्या आधी जून 2013 मध्ये मुख्यमंत्री नितीश कुमार एनडीएमधून बाहेर पडले होते. त्यानंतर बिहारमध्ये त्यांचा पक्षाने स्वतंत्रपणे निवडणूक लढवली होती. याशिवाय, नितीश कुमार यांनी 2015च्या बिहार विधानसभा निवडणुकांमध्ये लालू प्रसाद यादव यांच्या आरजेडीसोबत युती केली होती. त्यानंतर 2017 मध्ये भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरुन त्यांनी आरजेडीसोबतची युती तोडली. त्यानंतर ते पुन्हा एनडीएमध्ये परतले.