पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) तेलंगणा दौऱ्यावर आहेत. यावेळी जनतेला संबोधित करताना त्यांनी तेलंगणा सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. "लोक मला विचारतात तुम्ही थकत नाहीत का? त्यावर मी रोज 2-3 किलो शिव्या खातो म्हणून थकत नाही. देवाच्या आशीर्वादाने मला दिलेल्या शिव्या न्यूट्रीशनमध्ये बदलतात" असं नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.
नरेंद्र मोदी यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचं नाव न घेता ते भ्रष्टाचार आणि घराणेशाहीच्या राजकारणात सहभागी असल्याचं म्हटलं आहे. "राज्याला 'कुटुंब नव्हे, प्रथम जनतेचे' सरकार हवे आहे. तुम्ही मोदींना शिव्या द्या, भाजपाला शिव्या द्या, पण तुम्ही तेलंगणातील जनतेला शिव्या दिल्या तर तुम्हाला त्याची मोठी किंमत चुकवावी लागेल" असंही म्हटलं आहे.
पंतप्रधानांचे कार्यकर्त्यांना आवाहन
मोदींनी मला तेलंगणातील कामगारांसाठी वैयक्तिकरित्या प्रार्थना करायची आहे. हताश, भीती आणि अंधश्रद्धेतून काही लोक मोदींच्या विरोधात अनेक शिव्या देतील. त्यांच्या फसवणुकीमुळे दिशाभूल होऊ नये अशी मी प्रार्थना करतो असं म्हटलं आहे. केंद्र सरकारच्या योजनांच्या अंमलबजावणीत राज्य सरकार जाणीवपूर्वक अडथळे निर्माण करत असल्याचा आरोप त्यांनी केला.
सरकारच्या अंधश्रद्धेवर लगावला टोला
पीएम मोदींनी राज्याचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांना अंधश्रद्धेवरून टोला लगावला आहे. कुठे राहायचे, कुठे पद भूषवायचे, कोणाला मंत्री करायचे हे सर्व महत्त्वाचे निर्णय अंधश्रद्धेच्या धर्तीवर घेतले जात असल्याचा दावा त्यांनी केला. "सामाजिक न्यायातील हा सर्वात मोठा अडथळा आहे. तेलंगणा हे माहिती तंत्रज्ञानाचे केंद्र आहे. पण, या आधुनिक शहरात अंधश्रद्धेला प्रोत्साहन दिले जात आहे, ही खेदाची बाब आहे. तेलंगणाचा विकास करायचा असेल, तर सर्वप्रथम अंधश्रद्धा इथून दूर कराव्या लागतील" असं म्हटलं आहे.
ऑनलाईन पेमेंटमुळे कमी झाला भ्रष्टाचार
तपास यंत्रणा आपल्या भ्रष्टाचाराची चौकशी करतील या भीतीने विरोधी पक्ष एकत्र येत असल्याचा दावा पंतप्रधान मोदी यांनी केला. ते म्हणाले की, सरकारने डिजिटल व्यवहार आणि ऑनलाईन पेमेंटला प्रोत्साहन दिले. त्यामुळे भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे. कारण, यातून सर्वांचे वास्तव समोर येईल. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.