नवी दिल्ली: यंदाच्या वर्षातलं शेवटचं सूर्यग्रहण पाहण्यासाठी राज्यासह देशभरात नागरिकांमध्ये उत्साह पाहायला मिळतो आहे. देशाच्या बहुतांश भागातून कंकणाकृती सूर्यग्रहण दिसण्यास सुरुवात झाली आहे. सूर्य आणि पृथ्वी यांच्यात चंद्र आल्यानं विलोभनीय दृश्य दिसू लागलं आहे. गुजरातमधील द्वारका भागातून सर्वप्रथम ग्रहण दिसण्यास सुरुवात झाली होती. नागिकांप्रमाणेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील दिल्लीतील पंतप्रधान कार्यालयाच्या निवस्थानामधून सूर्यग्रहण पाहण्याचा प्रयत्न केला. मात्र ढगाळ वातावरणामुळे त्यांना थेट सूर्यग्रहण पाहता आलं नसल्याचे खुद्द नरेंद्र मोदी यांनी ट्विटरच्या माध्यमातून सांगितले आहे.
नरेंद्र मोदी म्हणाले की, मी देशातील नागरिकांप्रमाणे सूर्यग्रहण पाहण्यासाठी उत्सुक होतो. परंतु ढगाळ वातावरणामुळे मला थेट सूर्यग्रहण पाहता आलं नाही. त्यामुळे लाइव्ह स्ट्रीमिंगद्वारे कोझीकडे आणि देशातील विविध ठिकाणाचे सूर्यग्रहण वैज्ञानिकांसोबत पाहिले असल्याचे नरेंद्र मोदी यांनी सांगितले. भारताच्या दाक्षिणात्य भागात सूर्यग्रहण चांगलं दिसतयं मात्र उत्तरेकडील राज्यात ढगाळ वातावरणामुळे सूर्यग्रहण पाहण्यास अडथळा निर्माण झाला होता.
चंद्र पृथ्वीपासून दूर असताना त्याचा आकार नेहमीपेक्षा थोडा लहान दिसतो. अशा वेळी अमावास्येची तिथी व हे तीनही गोल सरळ रेषेत आले, तर ‘सूर्यग्रहण’ घडते; पण लहान दिसणारा चंद्र सूर्याला पूर्ण झाकू शकत नाही. परिणामी, सूर्यबिंबाचा कडेचा भाग एखाद्या बांगडीप्रमाणे दिसतो. या खगोलीय घटनेस ‘कंकणाकृती सूर्यग्रहण’ म्हणतात.