देहरादून: मला गुजरातचादक्षिण कोरिया करायचा होता, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तराखंड इन्वेस्टर्स समीटमध्ये बोलताना म्हटलं. मी पहिल्यांदा मुख्यमंत्री झालो, तेव्हा तुम्हाला गुजरातचं काय करायचं आहे, असा प्रश्न मला विचारण्यात आला होता. त्या प्रश्नाला मी दक्षिण कोरिया असं उत्तर दिलं होतं. कारण दक्षिण कोरिया आणि गुजरातची लोकसंख्या समान आहे. दोन्ही देशांना समुद्र किनारा लाभला आहे, असं मोदी म्हणाले. एक दिवसाच्या देहरादून दौऱ्यावर असलेल्या मोदींनी उत्तराखंड इन्वेस्टर्स समीटचं उद्घाटन केलं. यावेळी मोदींनी विविध देशांमधून समीटमध्ये सहभागी झालेल्या गुंतवणूकदारांना संबोधित केलं. 'देशात परिवर्तन सुरू असताना आज अनेक गुंतवणूकदार उत्तराखंडमध्ये उपस्थित आहेत. सध्याच्या घडीला देशाची अर्थव्यवस्था वेगानं वाढत आहे. महागाई स्थिर आहे. मध्यमवर्गाचा विकास अतिशय वेगानं सुरू आहे,' असं मोदींनी म्हटलं. भारताचा आर्थिक विकास अतिशय वेगानं होत आहे, असा दावा पंतप्रधानांनी केला. 'आम्ही 14 हजाराहून अधिक कायदे रद्द केले आहेत. देशाच्या कर व्यवस्थेत आमूलाग्र बदल घडवले आहेत. करप्रणाली सुधारणा करुन ती अधिक पारदर्शक केली आहे. बँकिंग व्यवस्था अधिक सक्षम केली आहे. जीएसटीची अंमलबजावणी करुन आम्ही कर रचनेत मोठा बदल केला आहे,' असं म्हणत भारत हा आता गुंतवणुकीसाठी अधिक अनुकूल झाल्याचं मोदींनी सांगितलं. यावेळी त्यांच्यासोबत उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत उपस्थित होते. ही समीट दोन दिवस सुरू राहणार आहे. उद्या गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली या समीटचा समारोप होईल.
मला गुजरातचा दक्षिण कोरिया करायचा होता- मोदी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 07, 2018 4:09 PM