अहमदाबाद : अहमदाबाद येथील सायन्स सिटी येथे व्हायब्रंट गुजरात ग्लोबल समिटला २० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात बुधवारी (२७ सप्टेंबर) पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी झाले. राज्याचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी नरेंद्र मोदींचे स्वागत केले. यावेळी व्हायब्रंट गुजरात ग्लोबल समिटच्या २० वर्षांच्या प्रवासाची आठवण करून देत तत्कालीन केंद्र सरकार सहकार्य केले नाही, असा आरोप नरेंद्र मोदी यांनी केला. आज जग व्हायब्रंट गुजरातचे यश पाहत आहे, परंतु तत्कालीन केंद्र सरकारने गुजरातच्या विकासाबाबत उदासीनता दाखवली, तेव्हा अशा वातावरणात व्हायब्रंट गुजरातचे आयोजन करण्यात आले होते, असे नरेंद्र मोदी यांनी सांगितले.
"तत्कालीन सरकारच्या केंद्रीय मंत्र्यांनी कार्यक्रमात सहभागी होण्यास नकार दिला आणि परदेशी गुंतवणूकदारांना गुजरातमध्ये गुंतवणूक न करण्याची धमकी दिली. तरीही, गुंतवणूकदार आले आणि त्यांना कोणतेही प्रोत्साहन दिले गेले नाही. गुंतवणूकदार केवळ सुशासन, न्याय्य प्रशासन, विकासाचे समान वितरण आणि पारदर्शक सरकारमुळे आले", असे नरेंद्र मोदी म्हणाले. याशिवाय, मागील केंद्र सरकार गुजरातच्या प्रगतीकडे राजकारणाच्या नजरेतून पाहत असल्याचा आरोप नरेंद्र मोदी यांनी केला. ते म्हणाले, "केंद्रीय मंत्री मला सांगायचे की ते कार्यक्रमाला नक्की येतील. पण, मला माहीत नाही, पाठीमागून काठी वापरली जात होती, नंतर ते नकार द्यायचे. त्यांनी कधीही सहकार्य केले नाही, अडथळे निर्माण केले."
याचबरोबर, २० वर्षांपूर्वी आपण एक लहान बीज पेरले होते. आज ते एक विशाल आणि दोलायमान वटवृक्ष झाले आहे. आम्ही गुजरातच्या पुनर्रचनेच,च नव्हे, तर त्याही पलीकडे विचार करत होतो. व्हायब्रंट गुजरातला आम्ही त्याचे मुख्य माध्यम बनवले. गुजरातचा आत्मविश्वास वाढवण्याचे आणि जगाशी डोळसपणे बोलण्याचे ते माध्यम बनले आहे, असे नरेंद्र मोदी यांनी सांगितले. तसेच, भारतातील विविध क्षेत्रांच्या अमर्याद शक्यता दाखविण्याचे हे एक माध्यम बनले. भारतातील कलागुणांचा देशातच उपयोग करून घेण्याचे ते एक माध्यम बनले. तसेच, भारताची दिव्यता, भव्यता आणि सांस्कृतिक वारसा जगाला दाखविण्याचे ते एक माध्यम बनले आहे, असेही नरेंद्र मोदी म्हणाले.