नवी दिल्ली: संसदेच्या अध्यायात एका नव्या अध्यायाची भर पडणार आहे. संसदेचे पाच दिवसीय विशेष अधिवेशन आजपासून सुरू होणार आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी ११ वाजता लोकसभेत बोलणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी नुकतेच संसद भवनात दाखल झाले आहेत. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. संसदेचे हे विशेष अधिवेशन छोटं असले तरी खूप महत्वाचे आहे. हे ऐतिहासिक निर्णयांचे अधिवेशन आहे. अधिवेशन छोटं आहे. त्यामुळे विरोधकांनी सहकार्य करावं. रडगाणं गाण्यासाठी नंतर बराच वेळ आहे, अशी टीका नरेंद्र मोदींनी विरोधकांवर केली.
२०४७ पर्यंत देशाला विकसित देश बनवायचे आहे. त्यासाठी येणाऱ्या काळातील सर्व निर्णय नवीन संसद भवनात घेतले जातील, असं सूचक वक्तव्य नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. तसेच चंद्रावर मोठ्या अभिमानाने तिरंगा फडकतोय. तसेच जी-२० परिषद यशस्वीरित्या पार पडली. भारत ग्लोबल साऊथचा आवाज बनला असल्याचं नरेंद्र मोदींनी सांगितले.
संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सांगितले की, अधिवेशनात एकूण आठ विधेयके मांडली जातील, त्यापैकी चार विधेयके सरकारने उघड केली असून उर्वरित चार विधेयकांबाबत चर्चा सुरू आहे. विशेष अधिवेशनाबाबत अनेक दिवसांपासून राजकारण सुरू आहे. विशेष अधिवेशनापूर्वी अजेंडा जाहीर करण्याची परंपरा नसल्याचे सांगून यापूर्वी सरकारने मौन बाळगले होते, मात्र काही दिवसांपूर्वी अजेंडा सार्वजनिक करताना विशेष अधिवेशनात चार विधेयके मंजूर करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीसाठी विधेयक, सरकार आणि विरोधकांमध्ये संघर्षाचा मुद्दा कायम आहे. अनेक वर्षांपासून रखडलेले महिला आरक्षणासंबंधीचे विधेयक सरकारने मांडावे आणि ते मंजूर करावे, अशी मागणी काँग्रेसने सरकारकडे केली आहे. भाजपाने आपल्या सर्व खासदारांना पाच दिवस सभागृहात हजर राहण्यास सांगितले आहे. एक देश, एक निवडणूक ते महिला आरक्षण आणि इंडिया विरुद्ध भारत या मुद्द्यांवर काही विशेष सत्र देखील होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. आता सरकार यावेळी आश्चर्यचकित करणार का, की संसदीय दौऱ्यावर सभागृहात चर्चा होऊन केवळ अजेंड्यावरील विधेयकांवरच चर्चा होणार का, हे पाहावे लागेल.
पहिल्यांदाच ७५ वर्षांच्या संसदीय प्रवासावर होणार चर्चा-
अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी म्हणजे आज ७५ वर्षांचा संसदीय प्रवास, उपलब्धी, अनुभव, आठवणीवर राज्यसभेत चर्चा होणार आहे. स्वातंत्र्यानंतर काय साध्य झाले, यावर चर्चा केली जाईल आणि त्यानंतर आठ विधेयके मांडली जातील. विशेष अधिवेशनाच्या पाचही दिवशी सर्व कॅबिनेट मंत्री आणि राज्यमंत्र्यांना सभागृहाच्या संपूर्ण कामकाजात उपस्थित राहण्याचे निर्देश सरकारने दिले आहेत.
सर्व खासदारांचे ग्रुप फोटो काढले जाणार-
लोकसभा आणि राज्यसभेचे सर्व ७९५ सदस्य (लोकसभेचे ५४५ खासदार आणि राज्यसभेचे २५० खासदार) मंगळवारी सकाळी ९.३० वाजता सामूहिक छायाचित्रासाठी जमतील. पहिल्या फोटोत लोकसभा आणि राज्यसभेचे सदस्य असतील. दुसऱ्या फोटोत फक्त लोकसभा सदस्य आणि तिसऱ्या फोटोमध्ये फक्त राज्यसभेचे सदस्य असणार आहे.