नवी दिल्ली: गेल्या काही दिवसांपासून कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव (CoronaVirus Cases) वाढताना दिसत आहे. महाराष्ट्रासह गुजरात, केरळ अशा राज्यांमध्येही रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी एक बैठक घेतली. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून झालेल्या या बैठकीत पंतप्रधान मोदींनी यासंदर्भात आपले मत मांडले. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढला, तर रोखणे कठीण होईल. राज्यातील चाचण्यांची संख्याही वाढवायला हवी, अशा सूचना पंतप्रधान मोदींनी यावेळी केली. (pm narendra modi says we should stop wave of coronavirus and increase corona testing) कोरोना विषाणू संसर्गाची दुसरी लाट आली आणि कोरोनाचा कहर असाच कायम राहिला, तर परिस्थिती हाताळणे कठीण होईल. कोरोना रोखणे किंवा कोरोना संसर्गावर नियंत्रण मिळवणे आताच्या घडीला सर्वाधिक महत्त्वाचे आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.
कोरोना संसर्गाला इथेच रोखणे आवश्यक
जागतिक स्तरावरील अनेक देशांमध्ये कोरोनाची दुसरी लाट आलेली आहे. तर काही देशांमध्ये कोरोनाचे नवे प्रकार आढळून आले आहेत. भारतातही अनेक राज्यांमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे. मध्य प्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान, गुजरात यांसारख्या राज्यांमध्ये पॉझिटिव्ह रेट खूप वाढला आहे. कोरोना संसर्गाला रोखले नाही, तर त्याचा विपरीत परिणाम संपूर्ण देशात पाहायला मिळू शकतो, अशी भीती पंतप्रधान मोदींनी यावेळी बोलताना व्यक्त केली.
कोरोना चाचण्या वाढवल्या पाहिजेत
जनतेला पॅनिक मोडमध्ये आणता कामा नये. भीतीचे वातावरण निर्माण होऊ द्यायचे नाहीए. कोरोना संकटातून जनतेला दिलासा देण्यासाठी पावले उचलणे आवश्यक आहे. गतवर्षीच्या अनुभवातून शिकून नवीन गोष्टी अमलात आणायला हव्यात. राज्यांनी कोरोना चाचण्या वाढवण्यावर अधिकाधिक भर दिला पाहिजे, अशा सूचना पंतप्रधान मोदींनी यावेळी केल्या.
महाराष्ट्रात तब्बल 56 टक्के कोरोना लसी वापराविना; प्रकाश जावडेकरांचे राज्य सरकारवर गंभीर आरोप
कोरोना लसीचे डोस फुकट घालवू नका
देशभरात कोरोना लसीकरणाचा वेग वाढवायला हवा. तेलंगण, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये कोरोना लसीकरणाचा आकडा १० टक्क्यांवर गेला आहे. असे होता कामा नये. देशात दररोज किमान ३० लाख नागरिकांना कोरना लस देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. तसेच राज्यांनी कोरोना लसीचा डोस फुकट जाणार नाही, याचीही काळजी घेतली पाहिजे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी बोलताना सांगितले.
दरम्यान, पंतप्रधान मोदींसोबत झालेल्या या बैठकीत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हजेरी लावली नाही. योगी आदित्यनाथ पश्चिम बंगालमधील प्रचारसभेत व्यस्त असल्याचे कारण सांगितले जात आहे.