विजयवाडा: आंध्र प्रदेशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेत मोठी चूक (PM Narendra Modi Security Breach) झाल्याची माहिती समोर आली आहे. पंतप्रधानांच्या हेलिकॉप्टरजवळ येऊन काँग्रेसकडून काळे फुगे हवेत सोडण्यात आले. ही घटना विजयवाडामध्ये घडली असून, या घटनेचा एक व्हिडिओही सध्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने याबाबतचा व्हिडिओ पोस्ट केला आहे.
भाजपला विरोध दर्शवण्यासाठी काँग्रेसकडून हे काळे फुडे सोडण्यात आल्याचे बोलले जात आहे. मोठ्या प्रमाणात काँग्रेस कार्यकर्त्यांनी काळे फुगे हवेत सोडले. विशेष म्हणजे, काँग्रेस कार्यकर्ते पंतप्रधानांच्या हेलिकॉप्टरजवळ येणार, याबाबत सुरक्षा अधिकाऱ्यांनाही काही माहिती नव्हती. अधिकाऱ्यांकडून याबाबत काहीही सांगण्यात आले नाही. आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथून जेव्हा पीएम मोदींचे हेलिकॉप्टर उड्डाण घेणार होते, तेव्हाच हे फुगे सोडले जात असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. या प्रकरणावर आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्याकडूनही कोणतीही माहिती आली नाही.
यापूर्वीही झाली मोठी चूकयाआधी पंजाब विधानसभा निवडणुकीदरम्यान पीएम मोदींच्या सुरक्षेत मोठी चूक झाली होती. पठाणकोटमध्ये रॅलीसाठी जात असताना शेतकरी आंदोलनाशी संबंधित आंदोलकांनी त्यांचा ताफा अडवला होता. आंदोलकांनी रस्त्यात मोदींचा ताफा अडवल्यामुळे जवळपास 30 मिनीटे मोदी रस्त्यावर अडकून पडले होते. या मुद्द्यावर केंद्र सरकारने पंजाब सरकारकडून उत्तरही मागवले होते. नंतर पंजाबच्या तत्कालीन काँग्रेस सरकारने याबाबत खंत व्यक्त केली होती. यावरुन देशभरात मोठा गदारोळ झाला होता.