पंजाबमध्ये भारत-पाकिस्तान (India Pakistan) सीमेवर असलेल्या हुसैनीवाला येथील शहीद स्मारकाला भेट देण्यासाठी जाणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या वाहनांचा ताफा बुधवारी दुपारी एका फ्लायओव्हरवर शेतकऱ्यांनी अडवला. अचानक घडलेल्या या घटनेमुळे सुरक्षा यंत्रणेत खळबळ उडाली. यानंतर मोदी पंजाबचा दौरा अर्धवट सोडून भटिंडा येथून विमानाने दिल्लीला रवाना झाले. याप्रकरणाची गंभीर दखल केंद्रीय गृहमंत्रालयाने (Home Ministry) घेतली असून सुरक्षा यंत्रणेतील गंभीर उल्लंघन व केलेल्या ढिसाळपणाबद्दल पंजाब सरकारला (Punjab Government) खुलासा मागितला आहे. दरम्यान, काँग्रसचे नेते रणदीप सिंह सुरजेवाला (Randeep Singh Surjewala) यांनी जोरदार निशाणा साधला आणि आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक व्हिडीओही शेअर केला आहे.
"प्रिय नड्डाजी, रॅली रद्द होण्याचं कारण रिकाम्या खुर्च्या होत्या. जर विश्वास बसत नसेल तर पाहून घ्या. हे उगाच केलेलं वक्तव्य नाही. शेतकरी विरोधी मानसिकतेचं सत्य स्वीकार करा आणि आत्मचिंतन करा. पंजाबच्या लोकांनी रॅलीपासून लांब राहून अहंकारी सत्तेला आरसा दाखवला आहे," असं ट्वीट करत सुरजेवाला यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे.
"पंजाबमध्ये आज काँग्रेस निर्मित घटनेचा ट्रेलर पाहायला मिळाला आहे आणि यातूनच या पक्षाचे विचार कळतात. काँग्रेस पक्षाकडून काय काम केलं जातं हे दिसून येतं. लोकांनी वारंवार नाकारल्यानं काँग्रेस पक्षाचं मानसिक संतुलन बिघडलं आहे. काँग्रेसच्या वरीष्ठ नेत्यांनी याबाबत देशाच्या नागरिकांची माफी मागितली पाहिजे", असंही ट्वीट त्यांनी केलं.