नवी दिल्ली: सर्व देशवासीयांचे लक्ष लागलेल्या चंद्रयान-३च्या प्रक्षेपणासाठी बाहुबली रॉकेट म्हणजेच लॉन्च व्हेईकल मार्क-३ (एलव्हीएम-३) आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा केंद्रावर सज्ज झाले आहे. आज दुपारी २.३५ वाजता चंद्रयान अवकाशात झेपावणार असून, आतापर्यंत या रॉकेटने १०० टक्के यशस्वी प्रक्षेपण केले आहे. प्रक्षेपण तर यशस्वी होणारच; पण पुढे चंद्रावर ऐतिहासिक लॅण्डिंगच्या यशाबद्दलही शास्त्रज्ञ आशावादी आहेत.
चंद्रयान-३च्या उड्डाणाआधी देशभरातून अनेक राजकीय नेते, अभिनेते, खेळाडू, नागरिक शुभेच्छा देत आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील ट्विट करत इस्त्रोला शुभेच्छा दिल्या आहेत. १४ जुलैचा दिवस भारतीय इतिहासात सुवर्ण अक्षरात लिहिला जाईल. चंद्रयान-३ मिशनसाठी मी सर्वांना शुभेच्छा देतो, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. हे उल्लेखनीय मिशन आपल्या देशाच्या आशा आणि स्वप्नांना पुढे नेईल, असा विश्वासही नरेंद्र मोदींनी व्यक्त केला आहे.
३,००,००० किमी पेक्षा जास्त अंतर कापून ते येत्या काही आठवड्यात चंद्रावर पोहोचेल. या यानातील वैज्ञानिक उपकरणं चंद्राच्या पृष्ठभागाचा अभ्यास करतील चांद्रयान-२ हे तितकेच पथदर्शक होते कारण त्याच्याशी संबंधित ऑर्बिटरच्या डेटानं रिमोट सेन्सिंगद्वारे प्रथमच क्रोमियम, मॅगेनीज आणि सोडियम असल्याचं शोधून काढलं. हे चंद्राच्या चुंबकीय उत्क्रांतीबद्दल अधिक माहिती देखील देतं, असंही मोदींनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
२२ जुलै २०१९ रोजी प्रक्षेपित केलेली चंद्रयान-२ मोहीम ६ सप्टेंबरच्या पहाटे चंद्रावर लँडर आणि रोव्हर क्रॅश झाल्यानंतर अंशत: अयशस्वी झाली होती. मात्र त्यानंतर भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) नियोजित चंद्रयान-३ मोहीम हाती घेतली असून ती यशस्वी करण्यासाठी तयारी सुरू केली होती. दरम्यान, चंद्रयान-३ मध्ये ऑर्बिटर पाठवले जाणार नाही. यावेळी स्वदेशी प्रोपल्शन मॉड्यूल पाठवले जात आहे. ते लँडर आणि रोव्हरला चंद्राच्या कक्षेत घेऊन जाईल. यानंतर ते चंद्राभोवती १०० किमीच्या वर्तुळाकार कक्षेत फिरत राहील. त्याचे वजन २१४५.०१ किलोग्रॅम असेल, त्यापैकी १६९६.३९ किलो इंधन असेल. म्हणजेच, मॉड्यूलचे वास्तविक वजन ४४८.६२ किलो आहे.