थोड्याच वेळात डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाची दुसऱ्यांदा शपथ घेणार आहेत. ट्रम्पनी आपल्या मित्र राष्ट्रांना निमंत्रण दिले आहे. भारताकडून परराष्ट्र मंत्री एस जयशंकर उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी का गेले नाहीत, असा प्रश्न उपस्थित होत असताना मोदींनी ट्रम्प यांच्यासाठी खास पत्र लिहिल्याचे समोर येत आहे. शपथविधीनंतर जयशंकर हे पत्र ट्रम्प यांना देणार आहेत.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्यात जयशंकर पंतप्रधान मोदींचे विशेष दूत म्हणून भारताचे प्रतिनिधित्व करत आहेत. राष्ट्रपतींच्या शपथविधी समारंभात परराष्ट्रमंत्र्यांची उपस्थिती असणे हे आश्चर्यकारक नाही. राष्ट्रप्रमुखांच्या आणि सरकारप्रमुखांच्या शपथविधी समारंभांना विशेष दूत पाठवण्याच्या सामान्य प्रघाता नुसार जयशंकर तिथे गेले आहेत.
जयशंकर यांनी ट्रम्प यांना देण्यासाठी खास पत्र आणले आहे, असे सुत्रांनी सांगितले आहे. यामध्ये मोदी यांचा संदेश आहे. ट्रम्प लवकरच वॉशिंग्टन डीसीमधील कॅपिटल रोटुंडा येथे अमेरिकेचे ४७ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतील. अमेरिकेच्या वेळेनुसार, डोनाल्ड ट्रम्प दुपारी १२ वाजता अमेरिकेचे ४७ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतील. कडाक्याच्या थंडीमुळे हा कार्यक्रम हॉलमध्ये घेतला जात आहे. ट्रम्प यांच्या आधी १९८५ मध्ये रोनाल्ड रेगन यांचा शपथविधी सोहळाही असाच बंदिस्त पार पडला होता.
वॉशिंग्टन डीसीमधील थंडी लक्षात घेऊन ट्रम्प यांनी त्यांच्या समर्थकांना रस्त्यावर आनंद साजरा करू नका आणि घरीच राहण्याचे आवाहन केले आहे. तसेच अमेरिकेतही अलर्ट जारी करण्यात आला आहे. प्रवासास मनाई करण्यात आली आहे.