नवी दिल्ली - जम्मू-काश्मीरमधील कठुआ येथे एका 8 वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार करुन तिची दगडाने ठेचून निर्घृण हत्या केल्याच्या घटनेमुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कठुआ आणि उन्नाव सामूहिक बलात्कार प्रकरणी मौन बाळगल्याबाबत माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी टीकास्त्र सोडले आहे. मौनावरुन नरेंद्र मोदी यांनी आपल्याला जो बोलण्याचा सल्ला दिला होता त्याची अंमलबजावणी त्यांनी करावी व अशा प्रकरणांवर त्यांनी बोलावे, असा सल्ला देत मनमोहन सिंग यांनी मोदींवर टीका केली आहे.
'इंडियन एक्स्प्रेस'ला दिलेल्या मुलाखतीत सिंग यांनी नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. बलात्कार प्रकरणांबाबत मोदींनी अखेर शनिवारी (14 एप्रिल) मौन सोडले ते पाहून आनंद झाला, असे त्यांनी मुलाखतीदरम्यान म्हटले. ''मुलींना न्याय मिळेल आणि दोषींची मुक्तता केली जाणार नाही, असे मोदी म्हणाले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त नियोजित कार्यक्रमात मोदी बोलत होते.भाजपा डॉ. सिंग यांना मौन-मोहन सिंग असे टोमणे मारत असे त्याबाबत विचारले असता ते म्हणाले की, आपण अशा प्रकारचे टोमणे झेलतच संपूर्ण आयुष्य जगलो आहोत.
''मला असे वाटते की पंतप्रधान नरेंद्र मोदी जो सल्ला मला दिला होता, त्यावर आता स्वतः अंमलबजावणी करण्याची आवश्यकता आहे आणि त्यांनी अधिकाअधिक बोलत राहावे. माझ्या न बोलण्यावर मोदी टीका करायचे, आता त्यांनी मला दिलेल्या सल्ल्यावर स्वतः अंमलबजावणी करावी'', असे सिंग यांनी म्हटले.
यावेळी मनमोहन सिंग असेही सांगितले की, नवी दिल्लीमध्ये 2012मध्ये झालेल्या निर्भया बलात्कार प्रकरणानंतर काँग्रेस पार्टी आणि त्यांच्या सरकारनं आवश्यक पाऊल उचलले होते आणि बलात्कार प्रकरणांसंदर्भात कायद्यामध्ये बदलदेखील केले होते.