Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येत रामलला प्राणप्रतिष्ठा सोहळा आणि राम मंदिराचे लोकार्पण करण्यात आले. या भव्यदिव्य सोहळ्याला हजारो जण उपस्थित होते. संत-महंतांपासून बॉलिवूडमधील दिग्गज सेलिब्रिटींनी आवर्जून हजेरी लावली. संपूर्ण देशात उत्सव साजरा करण्यात आला. राम मंदिर सोहळ्याला उपस्थित असलेल्यांना संबोधित केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राम मंदिर बांधकामात सहभागी असलेल्या मजुरांचा सन्मान केला. मजुरांवर पुष्पवृष्टी केली.
सर्वोच्च न्यायालयाच्या ऐतिहासिक निर्णयानंतर राम मंदिर बांधकामाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर एक निश्चित कार्यक्रम आणि नियोजन हाती घेऊन राम मंदिराचे बांधकाम हाती घेण्यात आले. टाटा, एलएनटी यांच्या वरिष्ठ आणि अनुभवी तंत्रज्ञ, कुशल मजूर यांच्या अथक परिश्रमानंतर राम मंदिराचे भव्य रुप देशासह जगासमोर उभे राहिले. अद्याप राम मंदिराचे काम पूर्ण झालेले नाही. राम मंदिर परिसरात विविध मंदिरे आणि अन्य बांधकाम केले जाणार आहे. पुढील अनेक शतके राम मंदिराला काहीच होणार नाही, अशा पद्धतीने हे मजबूत बांधकाम करण्यात आले आहे.
PM मोदींची मजुरांवर पुष्पवृष्टी, योगदानाचे कौतुक
अयोध्येतील श्रीराम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी कुबेरटीला येथे गेले. तेथे भगवान शंकराची पूजा केली. यानंतर पंतप्रधान मोदी यांनी राम मंदिराच्या उभारणीशी निगडित मजुरांचे आभारही मानले. पंतप्रधान मोदींनी कामगारांवर पुष्पवृष्टी केली आणि या योगदानाचे कौतुक केले. प्राणप्रतिष्ठा सोहळा आणि संबोधनानंतर पंतप्रधान मोदींनी यावेळी उपस्थित असलेल्या विशेष पाहुण्यांची भेट घेतली.
दरम्यान, पंतप्रधान मोदींनी अयोध्येत भव्य राम मंदिर बांधून पूर्ण झाले. आता पुढे काय? असा सवाल करत उपस्थितांसमोर नव्या भारताचा एक संकल्प मांडला. आता आपण याच वेळेपासून पुढील एक हजार वर्षांनंतरच्या भारताची पायाभरणी केली पाहिजे. मंदिर निर्मितीपासून पुढे जाऊन आता आपण सर्व देशवासियांनी या घडीपासून एक समर्थ, सक्षम, भव्य, दिव्य भारताच्या निर्मितीची शपथ घेऊया, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले.