आंदोलनजीवी प्रवृत्तींपासून सावध राहा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा संसदेत हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2021 06:49 AM2021-02-09T06:49:50+5:302021-02-09T06:52:26+5:30
नव्या कृषी कायद्यांना यापूर्वी पाठिंबा देणाऱ्या विरोधी पक्षांनी आता घूमजाव केले आहे, असा आरोप मोदी यांनी केला.
नवी दिल्ली : आंदोलन केल्याशिवाय जगू न शकणारी ‘आंदोलनजीवी’ ही नवी जमात सध्या देशात पैदा झाली आहे. या आंदोलनकारी प्रवृत्तींपासून देशाने सावध राहायला हवे, अशी कडक टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी केली. नव्या कृषी कायद्यांना यापूर्वी पाठिंबा देणाऱ्या विरोधी पक्षांनी आता घूमजाव केले आहे, असा आरोपही मोदी यांनी केला.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणाबद्दल मांडण्यात आलेल्या आभार प्रदर्शनाच्या ठरावावरील चर्चेत विरोधकांनी अनेक मुद्दे राज्यसभेत उपस्थित केले होते. त्याला उत्तर देताना मोदी म्हणाले की, नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकऱ्यांनी सुरू ठेवलेले आंदोलन मागे घ्यावे. केंद्र सरकार शेतकऱ्यांशी चर्चा करण्यास तयार आहे. मोदी यांनी सांगितले की, नवे एफडीआय (विदेशी विध्वंसक विचारसरणी) फोफावताना दिसत आहे. अशा विचारांपासून देशाला वाचविण्यासाठी आपण सर्वांनी अधिक जागरूक राहिले पाहिजे. शेतकऱ्यांनी नव्या कृषी कायद्यांबद्दल केंद्र सरकारशी चर्चा करण्याकरिता पुढे यावे. आम्ही चर्चेसाठी तयार आहोत. याआधीही केंद्रीय कृषिमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींशी काही वेळा चर्चा केली आहे. आंदोलनात वयोवृद्ध गृहस्थ दिवसेंदिवस ठिय्या देऊन बसले आहेत, ही चांगली गोष्ट नाही. या वयोवृद्धांना आंदोलकांनी घरी परत पाठविले पाहिजे. नरेंद्र मोदी म्हणाले की, किमान हमीभावही कायम राहणार आहे. नव्या कृषी कायद्यांमुळे सुधारणा अधिक गतिमान होणार आहेत. त्याचा फायदा सर्वांनी घेतला पाहिजे.
शिखांची बदनामी करण्याचा डाव
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, शिखांबद्दल काही जणांनी वापरलेली बदनामीकारक भाषा अतिशय अयोग्य आहे. हा डाव हाणून पाडला पाहिजे.
शेतीमध्ये योग्य सुुधारणा झाल्या पाहिजेत असे तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी म्हटले होते.
त्यांच्या विचारांची अंमलबजावणी मोदी करत आहे याचा काँग्रेसला अभिमान वाटला पाहिजे, असा टोला नरेंद्र मोदी यांनी लगावला.
शरद पवारांनी विराेध केला नाही
शरद पवार व काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी याआधी शेती सुधारणांना पाठिंबा दिला आहे. आताही पवारांनी शेती सुधारणांना विरोध केलेला नाही. आमच्या सरकारला ज्या योग्य वाटल्या, त्या शेती सुधारणा आम्ही केल्या आहेत. यापुढेही करत राहू.
भाषणात डाॅ. सिंग यांचा उल्लेख
शेतीमध्ये योग्य सुुधारणा झाल्या पाहिजेत, असे तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी म्हटले होते. त्यांच्या विचारांची अंमलबजावणी मोदी करत आहेत, याचा काँग्रेसला अभिमान वाटला पाहिजे.
किमान हमी भाव कायम राहण्यासाठी कायदा करावा
गाझियाबाद : किमान हमी भाव कायम राहाण्यासाठी केंद्र सरकारने कायदा करावा अशी मागणी भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकैत यांनी पुन्हा केली आहे. भूक, अन्नधान्याशी संबंधित प्रश्नांवर व्यापारी पद्धतीच्या वाटाघाटी कोणीही करू नयेत. असे प्रयत्न करणाऱ्यांना देशाबाहेर हाकलून द्यायला हवे. केंद्राने नवे कृषी कायदे मागे घ्यावेत. शेतकरी सरकारशी चर्चा करण्याकरिता तयार आहेत असेही ते म्हणाले.