बंगळुरू :कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या दोन महिने अगोदर पंतप्रधाननरेंद्र मोदी रविवारी पुन्हा एकदा मंड्या आणि हुबळी-धारवाडला पोहोचले. दोन महिन्यांपेक्षा कमी कालावधीत मोदींचा हा सहावा राज्य दौरा आहे. काँग्रेस माझी कबर खोदण्याचे स्वप्न बघतेय, तर मी ‘एक्स्प्रेस वे’ बनविण्यात व्यस्त आहे, अशी टीका करीत मोदींनी विकासकामांचे उद्घाटन केले.
पंतप्रधानांनी आधी काँग्रेस-जेडीएसचा बालेकिल्ला असलेल्या मंड्यामध्ये रोड शो केला आणि त्यानंतर जाहीर सभेला संबोधित केले. मोदी म्हणाले, ‘‘काँग्रेस आणि त्यांचे मित्रपक्ष मोदींची कबर खोदण्याचे स्वप्न पाहत आहेत. पण मोदी ‘एक्स्प्रेस वे’ बांधण्यात मग्न आहेत. देशातील कोट्यवधी माता-भगिनींचे आशीर्वाद हेच मोदींचे सर्वांत मोठे सुरक्षा कवच आहे, हे काँग्रेसला माहीत नाही.’’ यावेळी पंतप्रधान मोदींसोबत कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, नितीन गडकरी हेही उपस्थित होते.
पंतप्रधानांनी १६ हजार कोटी रुपयांच्या योजनांची पायाभरणीही केली. त्यांनी बंगळुरू-म्हैसूर ‘एक्स्प्रेस वे’ जनतेला समर्पित केला. हा ‘एक्स्प्रेस वे’ बंगळुरू-निदाघट्टा-म्हैसूरला जोडेल. हा ११८ किमी लांबीचा एक्स्प्रेस वे असून, यामुळे तीन तासांचा प्रवास ७५ मिनिटांत पूर्ण होईल.
काँग्रेसने गरिबांना लुबाडले
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, २०१४ च्या आधी केंद्रात काँग्रेसचे सरकार होते. त्यावेळी त्या पक्षाच्या सरकारने गरिबांना लुटले, त्यांना उद्ध्वस्त केले. गरिबांच्या विकासासाठी असलेल्या निधीतून हजारो कोटी रूपये काँग्रेसने लुबाडले. गरिबांना ज्या हालअपेष्टा सहन कराव्या लागतात, त्याच्याशी काँग्रेसला काहीही देणेघेणे नाही.
महामार्गाची पायाभरणी...
पंतप्रधानांनी म्हैसूर-कुशालनगर चौपदरी महामार्गाची पायाभरणीही केली. ९२ किलोमीटर लांबीचा हा प्रकल्प सुमारे ४,१३० कोटी रुपये खर्चून विकसित केला जाणार आहे.
जगातील सर्वांत लांब प्लॅटफॉर्मचेही लोकार्पण
पंतप्रधान मोदी यांनी श्री सिद्धरुद्ध स्वामीजी हुबळी स्थानकावरील जगातील सर्वांत लांब रेल्वे प्लॅटफॉर्म राष्ट्राला समर्पित केला. त्याची नुकतीच ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ने दखल घेतली आहे. प्लॅटफॉर्मची लांबी १५०७ मीटर म्हणजे सुमारे दीड किलोमीटर आहे. याशिवाय पंतप्रधानांनी होसापेटे रेल्वे स्थानकाचेही उद्घाटन केेले.
...म्हणून दांडीयात्रा स्मरणात राहील
मिठाचा सत्याग्रह, ज्याला १९३०ची दांडीयात्रा म्हणूनही ओळखले जाते. महात्मा गांधींची दांडीयात्रा विविध प्रकारच्या अन्यायाविरुद्धचा दृढ प्रयत्न म्हणून स्मरणात राहिल. दांडीयात्रेत सहभागी झालेल्या बापूंना आणि इतर सर्वांना मी आदरांजली अर्पण करतो. आपल्या देशाच्या इतिहासातील ही एक महत्त्वाची घटना होती. - नरेंद्र मोदी, पंतप्रधान
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"