नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी आज लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर उत्तर देताना काँग्रेसवर (Congress) जोरदार निशाणा साधला. काँग्रेस फुटीरतावादी मानसिकतेची असल्याची टीकाही पंतप्रधान मोदी यांनी यावेळी केली. जबाबदारी केवळ सत्तेची नाही तर एका स्वतंत्र व्यक्तीची असते. जर तुम्ही ती जबाबदारी समजू शकत नाही तर तुम्हाला स्वातंत्र्याचा अर्थ पूर्णपणे समजलेला नाही, या शब्दांत पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर हल्लाबोल केला.
काँग्रेस संविधानाचा अपमान करत आहे. राष्ट्र कोणतीही सत्ता किंवा सरकारी व्यवस्था नाही. आमच्यासाठी राष्ट्र ही एक जिवंत आत्मा आहे. काँग्रेसने गरिबी संपवण्याबाबत मोठ्या घोषणा केल्या. गरीब जागरुक आहेत, म्हणूनच तुम्हाला ४४ जागांवर समाधान मानावे लागले. देशातील गरीब सत्य जाणतात. गरिबी हटवण्याचा नाऱ्यावर काँग्रेस निवडणूक जिंकत राहिली. काँग्रेस १९७१ पासून गरिबी हटवत आहे. पण २०१४ मध्ये गरिबांनी काँग्रेसला हटवले, असा टोला पंतप्रधान मोदींनी लगावला.
काँग्रेस टुकडे-टुकडे गँगची लीडर
काँग्रेसच्या डीएनएमध्येच फुटीरतावादी मानसिकता आहे. तमिळ समाजाची भावना भडकवण्याचा प्रयत्न केला गेला. इंग्रज निघून गेले पण फोडा आणि राज्य करा याची मानसिकता काँग्रेसने टिकवून ठेवली. काँग्रेस ही टुकडे-टुकडे गँगची लीडर आहे, अशी घणाघाती टीका पंतप्रधान मोदी यांनी केली.
दरम्यान, मी हैराण आहे की काँग्रेसला अचानक कर्तव्याची बाब टोचतेय. तुम्ही म्हणता की मोदी नेहरुंचं नाव घेत नाहीत. तर मी आज तुमची इच्छा पूर्ण करतो. कर्तव्याबाबत पंडित नेहरु म्हणाले होते की, मी पुन्हा तुम्हाला सांगतो की स्वतंत्र भारत आहे. स्वतंत्र भारताचा वाढदिवस आपण साजरा करतो पण स्वातंत्र्यासोबत जबाबदारी असते. नागालँडसारख्या राज्याने २४ वर्षांपूर्वी काँग्रेसला नाकारले. अशीच परिस्थिती गोव्यात आलीय, तरीही काँग्रेसचा अहंकार गेलेला नाही, अशी टीकाही पंतप्रधान मोदी यांनी केली.