सिल्वासा: विरोधकांची आघाडी माझ्याविरोधात नव्हे, तर देशवासीयांच्या विरोधात आहे, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांना लक्ष्य केलं आहे. आमचं सरकार एका कुटुंबासाठी काम करत नाही. ते 130 कोटी देशवासीयांसाठी काम करतं. लोकशाहीचा गळा घोटणारे आज लोकशाही वाचवण्याची भाषा करताहेत, अशा शब्दांमध्ये त्यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. कोलकात्यात आज तृणमूल, काँग्रेस यांच्यासह एकूण 22 पक्षांची महारॅली आहे. विरोधकांच्या या एकजुटीवर मोदींनी जोरदार टीका केली आहे. मोदी आज विविध कार्यक्रमांसाठी सिल्वासात आहेत.भाजपामुळे आज पश्चिम बंगालमध्ये सर्व भ्रष्ट राजकीय पक्ष एकत्र आले आहेत. आम्ही भ्रष्टाचारविरोधी मोहीम सुरू करताच काँग्रेसला भीती वाटू लागली आणि महाआघाडीचे प्रयत्न सुरू झाले. भारत जगातील सर्वोत्तम देश व्हावा, असं आम्हाला वाटतं. त्यामुळे आम्ही 130 कोटी लोकांसाठी काम करतो आहे. आमचं लक्ष कामावर आहे. कारण आम्ही कामदार आहोत, नामदार नाहीत, असं म्हणत मोदींनी काँग्रेसला अप्रत्यक्षपणे लक्ष्य केलं. जेव्हा लोकशाहीचा गोळा घोटणारे लोकशाही वाचवण्याची भाषा करतात, तेव्हा देशाच्या जनतेलाही आश्चर्य वाटतं, असा टोला मोदींनी लगावला. भ्रष्टाचाराविरोधात मी कठोर पावलं उचलली आहेच. त्यामुळे काही पक्ष नाराज झाले आहेत आणि ते नैसर्गिकच आहे. त्यांना आता पूर्वीसारखी पैशांची लूट करता येत नाही. त्यामुळे आता त्यांनी एकत्र येत महाआघाडी केली आहे. ही आघाडी माझ्याविरोधात नव्हे, तर देशाच्या जननेविरोधात आहे. अद्याप आघाडी पूर्णपणे तयारही झालेली नाही. मात्र तरीही आपल्या वाट्याला काय येणार, यासाठी त्यांची सौदेबाजी सुरू आहे, असा घणाघात मोदींनी केला.