नवी दिल्ली : राज्यसभेतील ५६ खासदारांचा कार्यकाळ संपत असून त्यानिमित्ताने या खासदारांच्या आभार प्रदर्शनाची चर्चा राज्यसभेत पार पडली. या चर्चेमध्ये दोन्ही बाजूंच्या सदस्यांनी कार्यकाळ संपणाऱ्या सदस्यांच्या बाबतीत आभारप्रदर्शन करताना आपली भूमिका मांडली. कार्यकाळ संपणाऱ्या सदस्यांमध्ये माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचाही समावेश आहे. यावेळी मनमोहन सिंग यांच्याबाबत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काही महिन्यांपूर्वी घडलेल्या एका प्रसंगाचा उल्लेख केला. नरेंद्र मोदी म्हणाले, डॉ. मनमोहन सिंग हे सहा वेळा सभागृहाचे सदस्य राहिले आहेत, त्यांच्यात वैचारिक मतभेद आहेत, पण त्यांनी खूप मोठे योगदान दिले आहे.
कार्यकाळ संपणाऱ्या खासदारांचे स्मरण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, "जे सन्माननीय खासदार निघून जात आहेत, त्यांना जुन्या आणि नव्या दोन्ही संसदेच्या इमारतींमध्ये राहण्याची संधी मिळाली आहे. हे सर्व मित्र स्वातंत्र्याच्या सुवर्णकाळाच्या नेतृत्वाचे साक्षीदार म्हणून निघाले आहेत. कोविडच्या कठीण काळात आपण सर्वांनी परिस्थिती समजून घेतली, परिस्थितीशी जुळवून घेतले आणि कोणत्याही पक्षाच्या खासदाराने देशाचे काम थांबू दिले नाही."
डॉ. मनमोहन सिंग यांच्या योगदानाचे कौतुक करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, "डॉ. मनमोहन सिंग यांनी सभागृहाला अनेकदा मार्गदर्शन केले. जेव्हा खासदारांच्या योगदानाचा उल्लेख येईल, तेव्हा डॉ. मनमोहन सिंग यांची चर्चा नक्कीच होईल. डॉ. मनमोहन सिंग व्हीलचेअरवर आले आणि एका प्रसंगी मतदान केले. ते लोकशाहीला बळ देण्यासाठी आले होते. विशेषत: त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करत राहावे ही त्यांच्यासाठी प्रार्थना."
काळा टिका लावल्यामुळे प्रगतीला नजर लागत नाही आणि आज काळा टिका लावण्याचा प्रयत्न झाला, असे ब्लॅक पेपरवर भाष्य करत नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर निशाणा साधला. ते म्हणाले, "सभागृहाला काळ्या कपड्यांमध्ये फॅशन शो पाहण्याची संधी मिळाली. कधी कधी काही काम इतके चांगले असते की, ते दीर्घकाळ उपयोगी पडते. आमच्या जागी आम्ही काही चांगलं काम केलं तर आमच्या कुटुंबात एक नातेवाईक येतो आणि म्हणतो की नजर लागली तर काळा टिका लावेन. गेल्या १० वर्षात जी कामे झाली आहेत, त्याला कोणाची नजर लागू नये म्हणून आज खर्गेंजी काळा टिका लावून आले आहेत. आज आमच्या कामांना नजर लागू नये म्हणून तुमच्यासारखे ज्येष्ठ खासदार काळा टिका लावून आले आहेत, ही चांगली गोष्ट आहे."