गेल्या 5 वर्षांत लोकसभेत देशसेवेच्या दृष्टीने अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे. आज देश एक नवा आत्मविश्वास अनुभवत आहे. गेली पाच वर्षे देशात रिफॉर्म, परफॉर्म आणि ट्रान्सफॉर्मचे काम सुरू आहे. देश 17व्या लोकसभेवरील आशीर्वाद कायम ठेवेल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. लोकसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शनिवारी (10 फेब्रुवारी) अयोध्येतील राम मंदिरासंदर्भात चर्चा पार पडली. यावेळी त्यांनीही या चर्चेत भाग घेतला होता.
'17 व्या लोकसभेवरील देशाचा आशीर्वाद कायम राहील' -मोदी म्हणाले, सुधारणा आणि कामगिरी या दोन्ही गोष्टी घडतात आणि आपण बदल आपल्या डोळ्यांसमोर बघू शकतो, हे फार क्वचितच घडते. 17 व्या लोकसभेच्या माध्यमातून देश हे अनुभवत आहे आणि 17 व्या लोकसभेवरील देशाचा आशीर्वाद कायम राहील, असा माझा दृढ विश्वास आहे.
17 व्या लोकसभेने नवे मानदंड निर्माण केले -मोदी म्हणाले, 17 व्या लोकसभेने नवे मानदंड निर्माण केले आहेत. याच कालखंडात आपली राज्यघटना लागू होऊनही 75 वर्षे पूर्ण झाली आहेत. या कार्यकाळात अनेक सुधारणा झाल्या. गेम चेन्जर 21 व्या शतकाचा भक्कम पाया त्या सर्व गोष्टींमध्ये दिसून येतो. आपला देश एका मोठ्या बदलाच्या दिशेने वेगाने पुढे सरकला आहे.
अनेक पिढ्यांचे स्वप्न... -"अनेक पिढ्यांनी 'एक संविधान'चे स्वप्न बघितले होते. मात्र प्रत्येकवेळी अडथळा येत होता. खरे तर, याच सभागृहाने आर्टिकल 370 हटवून संविधानाचे संपूर्ण रूप प्रकट केल. संविधान तयार करणाऱ्या महापुरुषांची आत्मा आपल्याला आशीर्वाद देत असेल," असे मोदी म्हणाले.
'सर्वात मोठ्या संकटाचा सामना केला' -मोदी म्हणाले, "या 5 वर्षांत मानवजातीने शतकातील सर्वात मोठ्या संकटाचा सामना केला. कोण वाचेल, कोण नाही? कुणी कुणाला वाचवू शकेल की नाही? घरातून बाहेर पडणेही कठीण झाले होते. तरीही ससदेचे काम झाले. अध्यक्षांनी देशाचे काम थांबू दिले नाही." याशिवाय, पंतप्रधान मोदी यांनी यावेळी जी20 च्या अध्यक्षतेसंदर्भातही भाष्य केले. तसेच, लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांचेही कौतुक केले.