नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात २०२४ च्या लोकसभा निवडणुकीचा अजेंडा स्पष्ट केला आहे. ‘भ्रष्टाचारावर केलेली कारवाई’ या जोरावर भाजपा ही लढाई लढणार असल्याचे संकेत मोदींनी दिले आहेत. ईडी-सीबीआयच्या राजकीय गैरवापराबाबत विरोधकांच्या आरोपांमुळे विचलित न होता भ्रष्ट नेत्यांवर कारवाई सुरूच राहील असंही पंतप्रधान मोदींच्या भाषणातून संकेत मिळाले आहेत.
म्हणजेच आगामी काळात विरोधी पक्षनेत्यांच्या अडचणी वाढू शकतात. महिलांच्या सन्मानाचा मुद्दा उपस्थित करून पंतप्रधानांनी आगामी काळातही केंद्र सरकारच्या महिलाभिमुख योजना महत्त्वाच्या राहणार असल्याचे संकेत दिले आहेत. यामुळे २०२४ मध्ये पुन्हा सत्तेत येण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो याची जाणीव भाजपाला आहे. पंतप्रधानांनी विविध क्षेत्रातील पात्र तरुणांच्या प्रगतीमध्ये भ्रष्टाचार हा अडथळा असल्याचं म्हटलं. सर्व क्षेत्रांतून भ्रष्टाचार आणि घराणेशाहीचे समूळ उच्चाटन केल्यास त्या क्षेत्रातील तरुणांचा मार्ग सुकर होईल असं मोदींनी सांगितले. यामुळे बिगर राजकीय क्षेत्रातही भ्रष्टाचाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे स्पष्ट होते. यामुळे तरुणांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची प्रतिमा मजबूत होईल.
पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावरून 'महिलांच्या सन्मानाचा' मुद्दा गांभीर्याने घेतला आहे. सार्वजनिक जीवनातही लोक महिलांचा अपमान करतात, असे त्यांनी म्हटले आहे. यातून महिलांचा अपमान तर होतोच, पण त्यामुळे देशाच्या आणि समाजाच्या विकासाला खीळ बसते. २०४७ मध्ये देशाला विकसित राष्ट्र बनवण्याचे स्वप्न पाहायचे असेल, तर महिलांच्या सहभागाशिवाय हे काम अपूर्णच राहणार असल्याचे मोदींनी स्पष्ट केले. महिलांना योग्य भूमिका दिल्यास भारताला विकसित राष्ट्र बनवण्याचा संकल्प सोपा होईल. केंद्र सरकारच्या योजनांमध्ये येत्या काही वर्षांत महिलाभिमुख योजनांचा समावेश राहणार असल्याचेही यावरून स्पष्ट होते. २०१९ मध्ये भाजपाच्या सत्तेत पुनरागमन करण्यात महिलांचाही मोठा वाटा होता.
गेल्या काही दिवसांपासून अंमलबजावणी संचालनालय (ED) आणि सीबीआयकडून विरोधी पक्षांच्या नेत्यांवर सातत्याने कारवाई सुरू आहे. यूपी, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, बिहार, झारखंडपासून देशाच्या अनेक भागांमध्ये विरोधी पक्षांच्या नेत्यांवर किंवा त्यांच्या निकटवर्तीयांवर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत कोट्यवधी रुपयांची रोकड, मोठ्या प्रमाणात सोन्याचे दागिने आणि जंगम मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. ही कारवाई मुख्यतः विरोधी पक्षांच्या नेत्यांवर किंवा त्यांच्या जवळच्या लोकांवर झाली असल्याने, विरोधकांना धमकावण्याचा आणि राज्यात सत्ता मिळवण्याचा उद्देश असल्याचा आरोप विरोधक करत आहेत. पण हा आरोप पूर्णत: खरा नाही. केंद्र सरकारने राजकारणासह अनेक क्षेत्रातील भ्रष्टाचार्यांवर कारवाई केली आहे. केंद्र सरकारच्या कारभारात मूळ असलेल्या भ्रष्ट अधिकाऱ्यांना बळजबरीने निवृत्त करून त्याची सुरुवात झाली. नंतर अशाच प्रकारची कारवाई इतर बिगर राजकीय क्षेत्रातही करण्यात आली आहे असंही मोदींनी भाषणातून सूचित केले.