नवी दिल्ली- लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देत आहेत. नरेंद्र मोदींच्या भाषणाची सुरुवात जय श्री रामच्या घोषणांनी झाली. पंतप्रधान मोदींनी आपल्या अभिभाषणाच्या सुरुवातीला राष्ट्रपतींचे अभिनंदन केले. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर कोणाचाही आक्षेप नसल्याचेही नरेंद्र मोदींनी सांगितले.
आदरणीय राष्ट्रपती महोदयांनी आदिवासी समाजाचा गौरव तर वाढवलाच. स्वातंत्र्याच्या इतक्या वर्षानंतर आदिवासी समाजाचा गौरव वाढतोय, आत्मविश्वास वाढतोय. त्यामुळेच हे सभागृह आणि संपूर्ण देश त्यांचा आभारी आहे. राष्ट्रपतीच्या भाषणात संकल्प ते सिद्धीचा मुद्दा मांडला. जनतेला त्यांनी आपल्या भाषणातून प्रेरणा दिली. प्रजासत्ताकाचे प्रमुख म्हणून त्यांनी त्यांची उपस्थितीत ऐतिहासिकही आहे आणि देशाच्या कोट्यवधी बहिणी-मुलींसाठी प्रेरणाही आहेत, असं नरेंद्र मोदी म्हणाले.
नरेंद्र मोदी यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच अप्रत्यक्षपणे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला. मी काल राष्ट्रपतींचे अभिभाषण पाहत होतो. काहींच्या भाषणावेळी समर्थक उड्या मारत होते. खूप आनंदी होते. 'ये हुई ना बात' म्हणून शाबासकीही दिली. काल त्यांना चांगली झोप लागली असावी आणि त्यामुळे कदाचित आज ते उठू शकले नाही, अशी टीका नरेंद्र मोदी यांनी केली. राष्ट्रपतींच्या अभिभाषणादरम्यान काही टीका करण्याचा प्रयत्न केला. तसेच एका मोठ्या नेत्याने त्यांचा अपमानही केला, अशी टीका नरेंद्र मोदींनी केली. अशा लोकांना म्हटलं जातं की 'यह कह कह कर हम दिल को बहला रहे है, वो अब चल चुके है, वह अब आ रहे है,' असं म्हणत मोदींनी राहुल गांधींना टोला लगावला.
दरम्यान, आव्हानांशिवाय आयुष्य नाही. मात्र आव्हानांपेक्षा जास्त सामर्थवान १४० कोटी जनतेचं सामर्थ्य आहे. आव्हानांपेक्षा त्यांचं धैर्य, साहस मोठं आहे. कठीण काळ, युद्धासारखी परिस्थिती, अनेक देशात असलेली अस्थिरता, भीषण महागाई, अन्नाचा तुटवडा आणि आपल्या शेजारील देशात नागरिकांना खायला अन्न मिळत नाही. अशावेळीही आपला भारत देश जगातील पाचवी मोठी अर्थव्यवस्था बनली आहे, असं नरेंद्र मोदी यांनी यावेळी भाषणात म्हटलं.
पाहा नरेंद्र मोदींच्या लोकसभेतील भाषणाचा लाइव्ह व्हिडिओ-