पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचा आज 72 वा वाढदिवस आहे. भाजपा नेते आणि मोदी समर्थक आज मोठ्या उत्साहात त्यांचा वाढदिवस साजरा करत आहेत. वाढदिवसानिमित्त कराहल शहरातील मॉडेल स्कूल मैदानावर महिला बचत गटांच्या परिषदेला संबोधित करताना पंतप्रधान मोदी यांनी आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत. "वाढदिवशी मी सहसा माझ्या आईला भेटण्याचा प्रयत्न करतो. तिचा आशीर्वाद घेतो. आज मी माझ्या आईकडे जाऊ शकलो नाही पण मध्य प्रदेशच्या आदिवासी भागात, प्रत्येक गावात कष्ट करणाऱ्या लाखो माता मला आशीर्वाद देत आहेत” असं म्हटलं आहे.
“आज जेव्हा माझ्या आईला हे दृश्य दिसेल तेव्हा तिला नक्कीच समाधान होईल की लाखो मातांनी मला आशीर्वाद दिला आहे. ती आनंदी होईल. तुमचे आशीर्वाद आपल्या सर्वांसाठी एक महान शक्ती, महान ऊर्जा, प्रेरणा आहेत. माझ्यासाठी देशाच्या आई, बहिणी, मुली हे माझे सर्वात मोठे संरक्षण आहे. शक्तीचा स्रोत आहेत. ती माझी प्रेरणा आहे” असं देखील नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे. नरेंद्र मोदींचे नाव केवळ देशातीलच नव्हे, तर जगातील आघाडींच्या नेत्यांमध्येही सामील आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त विविध स्तरांतून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
मोदी पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी जे काही धडाकेबाज निर्णय घेतले त्या निर्णयांची चर्चा वाढदिवसानिमित्त सुरू आहे. मोदींनी आपल्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात जे ऐतिहासिक निर्णय घेतले त्यामुळे देशात त्यांची एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे. या निर्णयाची केवळ देशानेच नाही तर आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील नोंद घेण्यात आली. यामध्ये कलम 370, इंडिया गेट, अर्थसंकल्पाची तारीख, सीएए, एआरसी,आंतरराष्ट्रीय योग दिवस, जलशक्ती मंत्रालय, बालाकोट एअर स्ट्राइक, नोटबंदी, सरकारी बँकांचे विलिनिकरण, लॉकडाऊन, दिल्लीच्या रेस कोर्स रोडचे नाव, सेंट्रल व्हिस्टा, सर्जिकल स्ट्राईक, राजपथ झाले कर्तव्यपथ, किसान सन्मान निधी योजना, नीति आयोग, जीएसटी, राम मंदिर, वन नेशन, वन रेशन कार्ड, नौदल, ट्रिपल तलाक कायदा, वॉर मेमोरियल, इन्कम टॅक्स स्लॅबमध्ये बदल यांचा समावेश आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.