पंतप्रधान नरेंद्र मोदी कर्नाटकात निवडणुकीच्या प्रचारासाठी दाखल झाले. कर्नाटकातील बेल्लारी येथे जाहीर सभेला संबोधित करताना पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी 'द केरल स्टोरी' या चित्रपटाचाही उल्लेख केला. “केरल स्टोरी हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. मेहनती, हुशार आणि बुद्धीमान लोकांच्या सुंदर भूमीसाठी ओळखल्या जाणाऱ्या केरळमध्ये दहशतवादी कारस्थानांना कसं प्रोत्साहन दिलं जात आहे हे या चित्रपटात दाखवलं आहे,” असं मोदी म्हणाले.
"काँग्रेसच्या जाहीरनाम्यात अनेक खोटी आश्वासनं आहेत. काँग्रेसचा जाहीरनामा म्हणजे लॉकडाऊन आणि तुष्टीकरणाचा गठ्ठा आहे. आता काँग्रेसची अवस्था इतकी वाईट झाली आहे की त्यांचे पाय थरथर कापत आहेत आणि म्हणूनच माझ्या जय बजरंग बली बोलण्यावरही त्यांना आक्षेप आहे,” असं मोदी म्हणाले.
“आपल्या व्होटबँकसाठी काँग्रेसनं दहशतवादासमोर गुडघे टेकल्याचं पाहून मला आश्चर्य वाटलं. असा पक्ष कधी कर्नाटकाच्या सीमेचं रक्षण करू शकेल? कर्नाटकाला देशातील पहिल्या क्रमांकाचं राज्य बनवण्यासाठी संरक्षण, कायदा सुव्यवस्था आवश्यक आहे. कर्नाटकाचं दहशतवाद मुक्त राहणंही तितकंच आवश्यक आहे. दहशतवादाविरोधात भाजपची भूमिका कठोर राहिलीये. जेव्हा दहशतवादावर कारवाई होते, तेव्हा काँग्रेसला पोटदुखी होते,” असंही ते म्हणाले.
“येडियुरप्पा आणि बोम्मई यांच्या नेतृत्वाखाली डबल इंजिन सरकारला केवळ साडेतीन वर्षच सेवा करण्याची संधी मिळाली. जेव्हा इंकडे काँग्रेसचं सरकार होतं तेव्हा त्यांनी भ्रष्टाचाराला प्राधान्य दिलं. याचं कारण काय होतं? त्यांच्याच माजी पंतप्रधानांनी सांगितलं होतं. त्यांचं सरकार १०० पैसे पाठवतं तर १५ पैसेच गरीबांपर्यंत पोहोचतात. एकीकडे त्यांनीच मान्य केलं की काँग्रेस ८५ टक्के कमिशनचा पक्ष आहे. आज काँग्रेस समाजाचा नाश करणाऱ्या दहशतवादी प्रवृत्तीसोबत उभा आहे हे दुर्देव आहे,” असं मोदी म्हणाले.