“एकटा किती जणांवर भारी पडतोय हे देश पाहतोय,” विरोधकांच्या घोषणाबाजीदरम्यान मोदी कडाडले
By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2023 07:11 PM2023-02-09T19:11:29+5:302023-02-09T19:12:19+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या राज्यसभेतील भाषणादरम्यान विरोधकांनी घोषणा देण्यास सुरुवात केली. यावेळी पंतप्रधानही आक्रमक झाल्याचे दिसून आले.
राज्यसभेच राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना पंतप्रधाननरेंद्र मोदींनी विरोधकांना धारेवर धरलं. ८५ मिनिटं चाललेल्या या भाषणात पंतप्रधान मोंदींनी नेहरू आणि गांधी कुटुंब, कलम ३५६, नोकरी आणि बरोजगारी सारख्या मुद्द्यांवर भाष्य केलं.
“ज्यांना सत्तेशिवाय दुसरे काही दिसत नाही त्यांनी आर्थिक धोरणाचे अनर्थ धोरणात रूपांतर केले आहे. मी त्यांना सावध करू इच्छितो, या सभागृहाच्या गांभीर्याने मी त्यांना सांगू इच्छितो, आपापल्या राज्यात जा आणि समजावून सांगा की त्यांनी चुकीच्या मार्गावर जाऊ नका, बिनदिक्कत कर्ज घेऊन काय झालंय? शेजारील देशांची स्थिती पाहत आहात,” असं मोदी भाषणादरम्यान म्हणाले. “कर्ज घ्या, पुढची पिढी फेडेल, अशी त्यांची विचारसरणी आहे. कर्ज काढून तूप खाण्याचा विचार करणारे राज्य तर उद्ध्वस्त करतीलच पण देशही उद्ध्वस्त करतील. आजूबाजूचे देश बघा, जगात कोणीही त्यांना कर्ज द्यायला तयार नाही, ते संकटातून जात आहेत. देशाच्या आर्थिक आरोग्याशी खेळू नका. तुमच्या मुलांचे हक्क हिरावून घेणारे असे कोणतेही पाप करू नका,” असंही त्यांनी यावेळी नमूद केलं.
“सामाजिक न्याय, दोन वेळची पोळी यांसारखे प्रश्न आम्ही सोडवले आहेत, तुम्ही सोडवले नाहीत. स्वतंत्र भारताची स्वप्ने पूर्ण करण्याचा आमचा निर्धार आहे. एक व्यक्ती किती लोकांवर भारी पडतोय हे देश पाहतोय. एका व्यक्तीमुळे किती लोकांवर ओझे आहे. घोषणा देण्यासाठीही त्यांना (खासदार) बदलावं लागतं. दोन मिनिटं ते बोलतात. इथे तासाभरापासून आवाज दाबला गेला नाहीये,” असं म्हणत पंतप्रधानांनी निशाणा साधला.
“जितकी चिखलफेक कराल…”
“मी काम करतोय हे पाहून विरोधकांना त्रास होतोय. मला मल्लिकार्जुन खर्गे यांच्या वेदना समजत आहेत. तुम्ही दलितांबद्दल जर बोलत असाल तर, त्याच ठिकाणी निवडणुकीत दलितांना विजय मिळाला हेही तुम्ही पाहायला हवे. आता जनता तुम्हाला नाकारतेय म्हणून तुम्ही इथे तुमचे रडगाणे गात आहात. भारत हे संघराज्य आहे. गेल्या दशकामध्ये अनेक विचारवंतांनी घरी बसून देशाला दिशा दिली. असे लोकही घरात बसलेले असतात ज्यांनी आयुष्यात अनेक यश मिळवले आहे. सभागृहात जे घडते ते देश ऐकतो आणि गांभीर्याने घेतो. त्यामुळे तुम्ही आमच्यावर जितकी टीका किंवा चिखलफेक करायचा प्रयत्न कराल, तितक्या जास्त ठिकाणी (भाजपाचे) कमळ उमलेल,” असं म्हणत मोदींनी खर्गेंच्या टीकेचा समाचार घेतला.